ठेवीदारांच्या विश्‍वासाला पात्र राहुन अंबाजोगाईचा नांवलौकिक राज्यात वाढविणार – राजकिशोर मोदी

अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अंबाजोगाई : सहकार क्षेत्रात अग्रेसर ठरलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने सामान्य माणसाचा विश्‍वास संपादन केला आहे. अंबाजोगाईच्या सर्वांगिण विकासाला व अर्थकारणाला बँकेमुळे गती मिळाली आहे. बँकेच्या माध्यमातून सभासद, ठेवीदारांच्या विश्‍वासास पात्र राहुन अंबाजोगाईचा नावलौकिक राज्यात वाढविणार असल्याचे प्रतिपादन बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांनी केले. ते बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. 21 सप्टेंबर शनिवार रोजी अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन प्रकाश सोळंकी, प्रा.वसंतराव चव्हाण, विष्णुपंत सोळंके, दत्तात्रय दमकोंडवार, यांच्यसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मागील इतिवृत्ताचे वाचन बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय जड यांनी केले. याप्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की, 25 वर्षांपुर्वी अंबाजोगाईला हक्काची बँक नव्हती. म्हणून प्रारंभी योगेश्‍वरी पतसंस्था सुरू करावी लागली. पुढे रिझर्व्ह बँकेने व शासनाने मंजुरी दिल्यानंतर पिपल्स बँकेची उभारणी केली. एनपीए शुन्य टक्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बँकेच्या मुख्य कार्यालयासह 16 शाखा व दोन विस्तारीत कक्षांसह कार्यरत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यासहित राज्याच्या अर्थकारणात अल्पावधीत नावारूपास आलेल्या अंबाजोगाई पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने सहकार क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी करत ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. या विश्‍वासाच्या बळावरच सहकारात बँक अग्रेसर ठरली आहे असे चेअरमन राजकिशोर मोदी म्हणाले.

31 मार्च 2019 अखेर आपल्या सर्वांच्या सहकार्याने बँकेने 345 कोटी 92 लक्ष रूपयांच्या ठेवी जमविल्या आहेत. तसेच बँकेकडे 10629 सभासद तर वसुल भागभांडवल 10 कोटी 10 लाख,स्वनिधी 25 कोटी 90 लाख,एकुण गुंतवणूक 169 कोटी 90 लक्ष तर कर्ज वाटप 185 कोटी 34 लाख इतके असून बँकेस 31 मार्च 2019 अखेर 2 कोटी 5 लाख रूपये इतका नफा झाला आहे. स्थापनेपासुन बँकेस लेखापरिक्षणाचा ऑडीट ‘अ’ वर्ग मिळाला असल्याचे सांगुन कोअर बँकींगद्वारे शाखांची जोडणी केली आहे असे मोदी यांनी सांगितले.

यावेळी सभासदांच्या वतीने जनार्धनराव जगताप, दिनकर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. सभेत सर्व ठरावांना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. आनंद टाकळकर यांनी सुत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार संचालक प्रा.रोहिणी पाठक यांनी मानले. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.