राज्य उत्पादन शुल्कच्या अवैध मद्य व ताडीनिर्मिती केंद्रांवर धाडी

1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई : विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहीता काल लागू झाल्यानंतर त्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई व धारूर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व अडचणीच्या ठिकाणी म्हणजे अंबाजोगाई, चनई तांडा (ता.अंबाजोगाई) व आसरडोह (ता.धारूर) या तीनही ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी मद्य व ताडी निर्मिती, विक्री होत असल्याची माहिती प्राप्त होताच आज रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभाग निरीक्षकांच्या पथकाने धाड टाकून 1 लाख 2 हजार 96 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला असल्याची माहीती प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागा अंतर्गत वडवणी, केज, माजलगाव, धारूर, परळी, अंबाजोगाई हे सहा तालुके येतात. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सुचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्क बीडचे अधिक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने अवैध दारू, ताडी निर्मिती,विक्री, हातभट्टी केंद्रांवर कारवाई करण्यात येत आहे. याच अंतर्गत आज कारवाई करण्यात आली आहे. यात 2 वारस,1 बेवारस असे महाराष्ट्र दारूबंदी कायदा-1949 अंतर्गत एकूण 3 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. टाकलेल्या धाडीत तीनही ठिकाणी मिळून 3 हजार 800 लिटर रसायन,25 लिटर तयार हातभट्टी दारू,8.64 ब.लिटर देशी मद्य, 295 लिटर ताडी, 19 बॅरल (200 लिटर),4 टोपली,3 प्लास्टिक कॅन,8 जार असा एकूण 1 लाख 2 हजार 96 रूपायांचा मुद्देमाल जप्त करून त्यातील काही जागेवरच नष्ट करण्यात आला. सदरच्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक अनिल गायकवाड, जवान बि. के.पाटील, वाहन चालक के. एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर कारवाई – प्रभारी निरिक्षक अनिल गायकवाड

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विविध ठिकाणी अवैध हातभट्टी, ताडी निर्मिती व विक्री केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. मी पदभार घेतल्यापासुन गेल्या जानेवारी – 2019 पासुन सातत्याने धाडी टाकण्यात येत आहेत. आतापर्यंत 125 कारवाईची प्रकरणे करण्यात येवून 30 लाख 7 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या प्रकरणी अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.