वसुंधरा महाविद्यालय : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा पार पडला निरोप समारंभ

घाटनांदूर : तालुक्यातील घाटनांदूर येथील अभ्यासकेंद्र वसुंधरा महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या बी. ए. तृत्तीय वर्षांच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अरुण दळवे तर प्रमुख पाहुणे अंबाजोगाई येथील वंदेमातरम महाविद्यालयाचे प्रा. भगवंत पाळवदे हे होते. यावेळी मंचावर केंद्र संयोजक, प्रा. डॉ. गजानन सवने उपस्थित होते. निरोप समारंभात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

मनोगतात दिपाली कदम म्हणाली की, मी लग्न झाल्यापासून उच्च शिक्षणापासून वंचित होते, पण वसुंधरा महाविद्यालयाच्या माध्यमातून माझे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले व मला चांगली नोकरी मिळाली. अनुराधा सोनवणे या विद्यार्थिनीने आपले दुःख, दारिद्रय व्यक्त करत वसुंधरा महाविद्यालयाने कशाप्रकारे उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले ते सांगितले, तसेच नाथराव सिरसाट या विद्यार्थ्याने हालाकीच्या परिस्थितीवर मात करत एक यशस्वी युट्युबर कसा बनलो हे आपल्या विनोदी शैलीत सांगून उपस्थितांना खळखळून हसवले.

या बरोबरच मोहिनी कांबळे, दर्शन निळे ,रूपाली घुले, तेजस्विनी जोशी, बिलाल सय्यद यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात विद्यार्थ्यांनी संस्थेचे सचिव गोविंदराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण दळवे, केंद्र संयोजक, प्रा. डॉ. गजानन सवणे व सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे आभार मानले. 

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. पाळवदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व समजून सांगून जीवनात शिक्षणाचा कशाप्रकारे वापर करायचा हे अनेक उदाहरणे देऊन सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य, डॉ. अरुण दळवे यांनी विद्यार्थ्यांना वसुंधरा महाविद्यालय हे आपले ज्ञान मंदिर आहे, हे आपल्या सेवेत सतत खुले राहील, असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभ्यास केंद्राचे संयोजक, प्रा. डॉ. गजानन सवने यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. अनंत कांबळे यांनी केले. आभार प्रा. डॉ. सखाराम वाघमारे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.