डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अ‍ॅकॅडमीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रा. गौतम गायकवाड यांच्या ‘प्रज्ञा सुर्याचे सुर्यपुत्र’ ग्रंथास जाहीर

अंबाजोगाई : येथील प्रवर्तनवादी चळवळीतील आघाडीचे लेखक प्रा. गौतम गायकवाड यांच्या ‘प्रज्ञा सुर्याचे सुर्यपुत्र’ या ग्रंथास सन 2021 – 22 साठी दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अ‍ॅकॅडमीचा प्रथम राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या बाबतचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाल आहे. त्यांच्या या स्पृहणीय यशाबद्दल प्रा. गायकवाड यांचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

प्रा. गौतम गायकवाड हे आंबेडकरी चळवळीतील आघाडीचे लेखक, कवी व विचारवंत आहेत. त्यांच्या समग्र व उल्लेखनिय कारकिर्दीची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अ‍ॅॅकॅडमी, लातूर यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या ‘प्रज्ञा सुर्याचे सुर्यपुत्र’ या ग्रंथास सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 31 जुलै 2022 रोजी डॉ. भालचंद्र ब्लड बँक, बसस्टँड शेजारी, लातूर येथे आयोजित एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रा. गौतम गायकवाड यांना या पुर्वीही डॉ. जगजीवनराम लेखक पुरस्कार (नेपाळ), प्रेरणा समीक्षा पुरस्कार (पुणे), समाजभुषण पुरस्कार (सोलापुर), उत्कृष्ट लेखक पुरस्कार (लातूर) आणि व्ही.जे.आरक या ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

प्रा. गायकवाड यांचे 16 हून अधिक पुस्तके, विविध वृत्तपत्र, नियतकालिकांतून लेखन, दहापेक्षा अधिक ग्रंथांचे संपादन, त्यांनी केले आहे. या सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. अनेक चर्चासत्रात सहभाग घेत विविध नियतकालिकांतून त्यांचे अडीचशेहून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. नवोदित साहित्यीक, कवी यांना प्रोत्साहन देण्याचे तसेच त्यांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी सर्वोतोपरी भरीव सहकार्य करण्याचे कार्य देखिल प्रा. गायकवाड यांनी वेळोवेळी केले आहे. 

व्ही. जे. आरक सेवाभावी संस्था आणि परिवर्तन साहित्य मंडळाचे ते अध्यक्षही आहेत. तसेच ‘परिवर्तन संशोधन’ मासिकाचे कार्यकारी संपादक आहेत. परिवर्तन साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांचा पुढाकार आहे. आगामी काळात 11 विविध विषयांशी संबंधीत ग्रंथ, काव्य संग्रह, प्रवर्तन चळवळीला बळ देणार्‍या ग्रंथाचे लेखक म्हणूनही ते ओळखले जातील. या सर्व ग्रंथसंपदा प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

प्रा. गौतम केरबा गायकवाड हे सध्या अंबाजोगाईतील खोलेश्‍वर महाविद्यालयात मराठी भाषा विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. मागील 31 वर्षे ते अध्यापनाचे कार्य करीत आहेत. त्यांनी नाटक, कथा, कविता, प्रासंगीक, संशोधन, संपादन आदी विपुल ग्रंथ व साहित्य संपदा निर्मिली आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अ‍ॅकॅडमी, लातूर यांच्या वतीने त्यांनी लिहिलेल्या ‘प्रज्ञा सुर्याचे सुर्यपुत्र’ या ग्रंथास सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल प्रा. गौतम गायकवाड यांचे सामाजाच्या विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.