अंबाजोगाई : परळी मतदारसंघात मागील काही वर्षांपासून या – ना त्या कारणाने मुंडे बहिण – भाऊ हे विकास कामांच्या श्रेयाची लढाई लढत आहेत. यातून फक्त जनतेची दिशाभूल करणे एवढेच काम या दोन्ही मान्यवर नेत्यांकडून सातत्याने होताना दिसत आहे. यापुर्वी दिर्घकाळ सत्तेत असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यकाळात केलेल्या कोणत्याही विकास कामांचे श्रेय कधीही घेतले नाही.
ज्या उड्डाणपुलाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आपल्यामुळेच निधी मिळाला, असे सोशल मिडिया व प्रसार माध्यमातून परळीच्या बहिण – भावाने जाहिर करून स्वतःची पाठ थोपटून घेतली. परंतू, सुमारे 35 ते 36 वर्षांपुर्वी तत्कालीन बांधकाम मंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव पाटील यांच्या कार्यकाळात सदर उड्डाणपुलाचा प्रस्ताव, मंजुरी, निविदा, बांधकाम आदी कामे करून उड्डाणपुल जनतेला हस्तांतरित करण्यात आला.
काँग्रेस पक्षामुळेच हे काम त्यावेळेस मार्गी लागले आहे. याचा विसर या दोनही नेत्यांना पडला की काय ? त्यामुळे आपण न केलेल्या कामाचे श्रेय बहिण – भावाने घेवू नये व परळी मतदारसंघातील सुजाण जनतेची दिशाभूल थांबवावी, असे आवाहन बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केले आहे.
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, सुमारे 35 ते 36 वर्षांपुर्वी काँग्रेस पक्षाचे नेते व बीड जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव पाटील यांच्याकडे माजी मंत्री व तत्कालीन आमदार ॲड. पंडीतराव दौंड यांच्यासह जनतेने परळी शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी उड्डाणपुल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत माजी मंत्री पाटील यांनी तत्कालीन केंद्रिय रेल्वे मंत्री माधवराव सिंधीया यांच्याकडे पाठपुरावा केला. सदर उड्डाणपुलाचा प्रस्ताव, मंजुरी, निविदा, बांधकाम आदी कामे करून उड्डाणपुल जनतेला हस्तांतरित करण्यात आला व त्यास ‘वैद्यनाथ पुल’ असे नांव ही दिले.
पुढे राज्यात युतीचे सरकार आले आणि सदर पुलाचे ‘नामकरण’ करण्याचे काम तत्कालीन युती सरकारने केले व या पुलास डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुल असे नांव देण्यात आले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कधी विकास कामाचे श्रेय घेणे, तर कधी भाजपाच्या वतीने नामांतर करणे एवढीच कामे झालेली आहेत. यापूर्वी मुलभूत विकास कामे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परळी शहर व मतदारसंघात झालेली दिसून येतात. मोठ्या प्रमाणावर विकास कामे करूनही आमचे नेते माजी मंत्री अशोकराव पाटील व राष्ट्रीय नेत्या खासदार रजनीताई पाटील या काँग्रेस नेत्यांनी याचे कधीही श्रेय घेतले नाही किंवा त्या बाबत कधीही जाहिर वाच्यता ही केलेली नाही. असे असताना ही फक्त जनतेची दिशाभूल करणे एवढेच काम मुंडे बहिण – भावाकडून होताना दिसत आहे.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कार्यकाळात बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विकास निधी देवून जिल्ह्यातील रस्त्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले आहेत. हे सर्व बीड जिल्ह्यातील जनतेला ज्ञात आहे. परंतु, ना. गडकरी यांनी केलेल्या, मंजुरी व निधी दिलेल्या विकास कामांचे श्रेयही बीड जिल्ह्यातील मान्यवर नेते घेत असल्यामुळे जनतेला याचे आश्चर्य वाटू लागले आहे. एकच काम व त्याला मंजुरी मी आणली, मी आणली असा केविलवाना सुर परळी मतदारसंघात या नेत्यांकडून आळवला जात आहे. नेहमीच मुलभूत विकासाच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून, समस्यांची सोडवणूक न करता, गोर – गरीब जनतेला स्वस्त धान्य, आरोग्याच्या सुविधा अद्याप ही जिथे मिळत नाहीत.
सुशिक्षीत तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना परळी मतदारसंघातील जनतेला कायम भावनिक करून त्यांची दिशाभूल करणे व श्रेयवादाची लढाई लढणे एवढेच काम दोन्ही माजी पालकमंत्र्यांकडून होताना दिसत आहे, हे खेदजनक आहे. त्यामुळे आपण स्वतः न केलेल्या विकास कामाचे श्रेय माजी पालकमंत्री बहिण – भावाने घेवू नये, असे बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख म्हणाले.