रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन…

अतुल ठाकुर

मुंबईला कुणी कितीही नावे ठेवोत पण मुसळधार पावसातली मुंबई देखणी दिसते, यावर सर्वांचे एकमत व्हावे आणि त्यातही ही मुंबई जर सत्तरच्या दशकातली असेल तर क्या कहने. पुलंनी सर्व बलाढ्य शहरांमध्ये फक्त मुंबई ही स्त्रीलिंगी आहे हे नमुद केले आहे. या देखण्या मुंबईला आणखी देखणेपणाने सादर केले आहे बासु चटर्जींनी आपल्या ‘मंजील’ चित्रपटात. 

‘रिमझीम गीरे सावन’ या गाण्यावर बरेच काही लिहिता येईल. लताने गायिलेले उजवे की किशोरचे उजवे असा वादही घालता येईल. मात्र, मला त्यात पडायचे नाही. या लेखात तरी फक्त लताच्या गाण्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अत्यंत आशयघन असलेल्या या चित्रपटाची कथाही मी सांगणार नाही. कारण या गाण्याचा तसा कथेशी संबंध नाही. गाण्याचा सुरेख तुकडा बाजुला काढुन, कथा माहित नसताना देखिल त्याचा आस्वाद घेता येईल इतके हे गाणे अप्रतिम आहे. 

साधारणपणे याचं चित्रिकरण फोर्ट, चर्चगेट, मरीन ड्राईव्ह, मुंबई युनिव्हर्सिटीचा भाग, फाऊंटन या भागात केलेले दिसते. चित्रपट 1979 मधला आहे. सत्तरचे जादुई दशक. अमिताभचा उदयकाल. मात्र, अजुनही तो वेगळ्या भूमिका करत असतानाचे ते सुदैवी दिवस. त्यात मौशमी चटर्जीसारखी निपूण आणि देखणी अभिनेत्री. हे सारे रसायन एकत्र येऊन सौंदर्याचा जो अविष्कार घडला तो म्हणजे ‘रिमझीम गीरे सावन’.

मी जेव्हा हे गाणे पाहिले तेव्हा आणि त्यानंतर नेहेमीच हे गाणं ऐकताना मला पावसाच्या गारेगार सरी अंगावर कोसळत असल्याची अनुभूती येते. लताने आवाजात चिंब ओलावा आणुन हे गाणे गायिले आहे. अशातर्‍हेने वातावरणाची अनुभुती आवाजात देणारी दुसरी गाणी मला तरी चटकन आठवत नाहीत. पण ही अनुभुती येथेच संपत नाही. गाण्यात नुसता पाऊसच नाही तर एकमेकांच्या हातात हात घालुन प्रेमात अगोदरच चिंब भिजलेले प्रियकर आणि त्याची प्रेयसी देखिल आहेत. त्यांना पावसात भिजताना मनात लागलेल्या प्रणयाच्या आगीची अनुभुती येते आहे.

कवी योगेश यांचे समर्पक शब्द या गाण्याला लाभले आहेत. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ तेव्हा हाच पावसाळा एवढा वेगळा का भासतो आहे ? हा प्रश्न प्रेयसीला पडला आहे. ‘पहले भी यूं तो बरसे थे बादल, पहले भी यूं तो भीगा था आंचल, अबके बरस क्युं सजन सुलग सुलग जाये मन…’ पडद्यावर गाणे जरी कुणी गात नसले तरी गाण्यातील भावना प्रेयसीच्या आहेत असं कुठेतरी आपल्याला जाणवतं. एकुणच हे गाणं मौशमीच्या अमिताभबद्दलच्या मुग्ध भावना मुकपणे व्यक्त करतं.

गाण्याचं चित्रिकरण हा एक अतिशय आकर्षक भाग. बासुदांनी मुंबईचा पावसाळा दाखवुन प्रेक्षकाला अगदी गारेगार करुन सोडलं आहे. मुळात हा कृत्रिम पाऊस नाही. अस्सलपणाची किमयाच वेगळी. कधी भुरभुरत, तर कधी जोरात पडणारा पाऊस, मरीन ड्राईव्हच्या रस्त्यांवर उसळणार्‍या समुद्राच्या लाटा, मैदानावर जागोजाग साचलेले पाणी, अवतीभवती छत्र्या घेऊन चाललेले मुंबईकर, पाण्यातुन चाललेल्या गाड्या, अशी सुखद दृश्य बासुदांनी घेतली आहेत. पाऊस थांबल्यावर ओली झालेली मुंबई, तिथले शांत झालेले जीवन. खरंतर अमिताभ आणि मौशमी इतकेच दुसरे आणखी एक प्रणयाराधन या गाण्यात चालले आहे ते पाऊस आणि मुंबईचे. त्याने प्रणयात तिला चिंब भिजवुन शांत केले आहे. 

पावसाळ्यात अंधारुन आल्यावर जाणवणारा गोड काळीमा आणि त्यात मुंबैच्या जुन्या भागातला परिसर या साऱ्यांनी आपली जादु या गाण्यात पसरली आहे. बासुदांच्या चित्रिकरणाइतकेच सुंदर संगीत आणि आकर्षक चालीचे श्रेय आरडीला द्यायलाच हवे. डोळे मिटुन हे गाणे ऐकल्यास आपल्यालाही कुठेतरी पावसाळ्यातल्या ओळखीच्या गोड खुणा पटतात आणि मन सुखावुन जाते.

अमिताभच्या उंच देहयष्टीसमोर मौशमी छोटी वाटते, पण कदाचित त्यामुळेच हे जोडपे अतिशय सुरेख दिसले आहे. त्याच्या लांब टांगा टाकत चालण्याबरोबर तिला जवळपास धावावे लागते. पण तिही प्रियकराच्या वेगाशी जुळवुन घेऊन त्याच्या बरोबरीने त्याच्या सहवासाचे सुख घेत पावसाची मजा लुटते आहे. मौशमीचे हसणे आकर्षक आणि त्या दाताच्या ठेवणीमुळे तर तीचे हसणे अतिशय गोड वाटते. हे हसु या गाण्यात अनेकदा दिसते. 

मरीन ड्राईव्हच्या धक्क्यावर उभे राहुन अमिताभ क्षणभर तिला थांबायला सांगुन सिगरेट काढतो आणि ती भिजलेली पाहुन फेकुन देतो, त्यावेळी मौशमी लाजवाब. असे क्षण या गाण्यात अनेक आहेत. हे हळुवारपणे पाहात, गाणे ऐकत वेचण्यात मजा आहे. शेवटी एक रिकामी बेंच पाहुन ती दोघे त्यावर एकमेकांच्या बाहुंत विसावतात आणि एका सुरेल गाण्याची, दृश्याची सांगता होते ती प्रेक्षकांना चिंब करुनच.