गोगलगायींचे संकट : सोयाबीनचे ‌‌‌‌पीक नष्ट, शेतकरी हवालदिल

शेतकऱ्यांना प्रति एकरी 25 हजार रुपये विशेष अनुदान द्या – ॲड. माधव जाधव

अंबाजोगाई : तालुक्यातील शेतकरी बांधवांनी चालू हंगामांमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी शेकडो हेक्टरमध्ये केलेली आहे. परंतू, गोगलगाईच्या नैसर्गिक अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गोगलगायींनी पेरलेले सोयाबीनचे पीक हे संपूर्णपणे खाऊन नष्ट केले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.

परंतू, दुबार पेरणी करून सुद्धा दुबार पेरलेले पीक गोगलगायींनी नष्ट केले आहे व खाऊन टाकले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. 

पेरणीसाठी अगोदरच कर्ज काढून पेरणी केली. परंतू, ते पीक गोगलगायींनी खाऊन टाकल्यामुळे पुन्हा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. गोगलगायींच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे शेतीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

या नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करून शेतकऱ्यांना प्रतिएकरी 25 हजार रुपये पेरणीसाठी विशेष अनुदान शासनाने द्यावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे ताबडतोब करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इमेलद्वारे मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी केली आहे.