औरंगाबादच्या नामांतराबाबत पूर्वकल्पना नव्हती : शरद पवार

औरंगाबाद : तत्कालीन सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद शहराच्या नामांतराचा ठराव घेतला, त्याबाबत आपल्याला पूर्वकल्पना नव्हती असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलत होते.

औरंगाबाद तसंच उस्मानाबाद शहरांच्या नामांतराऐवजी या शहरातल्या पाणी पुरवठ्यासह इतर नागरी समस्या आणि मूलभूत प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असं मतही शरद पवार यांनी व्यक्त केलं. 

राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील असं आपण म्हणालो नाही, अडीच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे, असं आपण कार्यकर्त्यांना सुचवलं असल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. नव्या सरकारच्या बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी खूपच तत्परता दाखवली, अशी तत्परता दाखवणारे ते पहिले व्यक्ती असल्याची उपरोधिक टीका पवार यांनी केली.

शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडाला काहीही आधार नसल्याची टीकाही पवार यांनी केली. 2024 ची निवडणूक महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी एकत्र लढवावी, अशी आपली इच्छा आहे. मात्र त्याबाबत मित्रपक्षांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही, असंही पवारांनी स्पष्ट केलं.