अंबाजोगाई : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ईआयटी कंपनीतर्फे चालू असलेली एचएमआयएस या सुविधेचा वापर दि. 5 जुलैच्या मध्यरात्रीपासुन बंद करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, या संस्थेत देखील एचएमआयएस प्रणालीचा वापर बंद करण्यात आलेला आहे. सदरील कंपनीतर्फे न्यायालयामध्ये याचीका दाखल करण्यात आली असुन न्यायालयाचा अवमान होऊ नये, म्हणून सदरील कंपनीतर्फे पुरविण्यात येणाऱ्या एचएमआयएस प्रणालीचा वापर बंद केलेला आहे, असे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी म्हटले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये सदरील प्रणालीचा वापर बंद करण्याअगोदर सर्व पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. सर्व सेवालिपीक वर्गीय कर्मचारी व इतर कर्मचारी यांच्या मार्फत दैनंदिन कामकाज सुरळीतपणे चालु असुन रुग्णसेवेत कोणताही अडथळा येत नसुन कोणत्याही रुग्णाची गैरसोय झालेली नाही.
तसेच एचएमआयएस प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीची सेवा येत्या तीन ते चार महिन्यामध्ये कार्यान्वीत करण्यासाठी शासन स्तरावर प्रक्रीया चालू आहे. बाहयरुग्ण विभागात रुग्णनोंदणी, आंतररुग्ण नोंदणी, अपघात विभागामधील नोंदणी तसेच सर्व चिकित्सालयीन व सर्व चाचण्या करणाऱ्या विभागातील रुग्णसेवा सुरळीतपणे चालू आहे. ऑपरेशन थियटर सुद्धा सुरळीतपणे चालु आहेत. सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे कुठल्याही रुग्णाची शस्त्रक्रीया लांबवण्यात आलेली नाही किंवा रद्द करण्यात आलेली नाही.
सर्व विभागामधील शस्त्रक्रिया (इमर्जन्सी/रुटीन) सुरळीतपणे चालु आहेत. सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे अद्याप कोणत्याही रुग्णाकडुन अथवा रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णसेवेबाबत कोणतही तक्रार प्राप्त झालेली नाही. सदरील ऑनलाईन प्रणाली बंद झाल्यामुळे रुग्णसेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही, असेही अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी म्हटले आहे.