बीड जिल्ह्यातील मुरली भगवान नवले आणि जिजाबाई मुरली नवले या वारकरी दाम्पत्याला महापूजेचा मान
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते. अशा वारीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सोयी – सुविधा देण्यात राज्य शासन कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. समाजातील सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख व समृद्धी येण्यासाठी राज्यासमोरील कोरोनासह सर्व अडचणी दूर करण्याचे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मानाचे वारकरी मु.पो. रुई, ता.गेवराई, जि. बीड येथील मुरली भगवान नवले (52) आणि जिजाबाई मुरली नवले (47) या दाम्पत्यासोबत विठ्ठल – रुक्मिणीची महापूजा केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह समितीचे अन्य सदस्य, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागील दोन वर्षे कोरोनामुळे आषाढी वारी होऊ शकलेली नाही. त्यामुळे या वर्षी 10 लाखापेक्षा अधिक वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहाने चालत आलेले आहेत. या सर्व वारकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. शासन शेतकरी, वारकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासह राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने महापूजा
राज्यात आषाढी एकादशीची वारी एक महापर्व असून या वारीला एक मोठी परंपरा लाभलेली आहे. आषाढी एकादशीला महापूजा करण्याचा सन्मान मिळाल्याने हा दिवस जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. राज्यातील 12 कोटी जनतेच्यावतीने आपण ही शासकीय महापूजा केली असल्याचे सांगून त्यांनी राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.