बनावट दारू निर्मीतीच्या कारखान्यावर पोलीसांचा छापा : 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

ग्रामीण पोलिसांची कारवाई : तिघांना घेतलं ताब्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील मौजे वरपगाव येथे एका फार्म हाऊसमध्ये बनावट दारू निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळताच त्या ठिकाणी छापा टाकत पाच लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले आहे. ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी ही कारवाई केली. दरम्यान यातील एक आरोपी फरार झाला आहे.

सतीश श्रीलालचंद हेला (वय 20 उत्तर प्रदेश), हरिओमकुमार श्रीबळीलाल सरोज (वय 19, दोघे रा. चकअहमदीपूर, ता. मंझनपूर जि. कौशांबी, उत्तरप्रदेश), संतोषकुमार श्रीदशरथ सरोज (वय 25, रा.पवईया, ता.मंझनपूर जि. कौशांबी, उत्तर प्रदेश) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे हे तिघे उत्तरप्रदेशातील असून स्थानिकांच्या मदतीने दारू निमिर्तीचा कारखाना चालवत होते. 

वरपगाव शिवारात एका फार्म हाऊसमध्ये बनावट दारूची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी दुपारी छापा मारला. यावेळी त्या ठिकाणाहून तीन लाख रुपयांची बनावट दारू, 20 पोते रिकाम्या बाटल्या, दोन कॅन रसायन, तीन ड्रम, पॅकिंगसाठी वापरली जाणारी मशीन व तत्सम साहित्य, बनावट लेबल, पाणी उपशासाठीचा विद्युत पंप असा एकूण पाच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विठ्ठल केंद्रे, स्वप्निल शिनगारे, महेश भागवत, बापूराव राऊत, कुलदीप खंदारे, बाळकृष्ण मुंडे, अनिल मिसाळ, मनीषा चाटे, कमलाकर गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, सदर फार्महाऊसचा मालक कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्य उत्पादन शुल्क झोपेत

पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग काय झोपेत आहे का ? असा प्रश्न आहे. अलीकडच्या काळात ढाबे, हॉटेलांवर सर्रास दारू विक्री आणि अशा बनावट दारूचा पेव फुटले असताना उत्पादन शुल्क विभाग हातावर हात मारून बसल्याने या विभागाच्या कामाबद्दल शंका उपस्थित होत आहे.