किसानपुत्र आंदोलन ‌: शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त 18 जूनला पुण्यात ‌पदयात्रा

पुणे : 18 जून रोजी, शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त पुणे येथे काळे ध्वज हातात घेऊन, पदयात्रा काढली जाणार आहे. त्यात किसानपुत्रांसोबत महाराष्ट्रातील स्वतंत्रतावादी शेतकरी नेते व पुणतांबा येथील शेतकरी आंदोलक नेते सहभागी होणार आहेत. या यात्रेचा समारोप महात्मा फुले वाड्यात होईल. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देखील शेतकरी गुलाम आहेत, असा दावा किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने करण्यात आला आहे.

पहिला घटना बिघाड

18 जून 1951 रोजी, पहिला घटना बिघाड करून भारतीय राज्यघटनेत नसलेले परिशिष्ट – 9 जोडण्यात आले. तेंव्हा घटना स्वीकारून फक्त दीडच वर्ष झाले होते. पहिली निवडणूक देखील झाली नव्हती. या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आलेल्या कायद्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही, अशी लोकशाही विरोधी तरतूद करण्यात आली. आज या परिशिष्टातील 284 कायद्यांपैकी 250 कायदे थेट शेतकऱ्यांशी संबंधित आहेत. सीलिंग, आवश्यक वस्तू आदी कायद्यांमुळे शेतकरी गुलाम बनला व आत्महत्या करू लागला. या कायद्यांना परिशिष्ट – 9चे संरक्षण मिळाले आहे. हे कायदे विषारी साप आहेत आणि परिशिष्ट – 9 हे या सापांचे वारूळ (घर) आहे. संविधानविरोधी असलेले हे कायदे रद्द व्हावे, शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळावे, म्हणून किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने दरवर्षी 18 जूनला ‘शेतकरी पारतंत्र्य दिवस’ पाळला जातो.

शेतकरी नेत्यांचा सहभाग

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील आणि ललित बहाळे, माजी अध्यक्ष अनिल घनवट, विचारवंत विनय हर्डीकर, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे विष्णुपंत भुतेकर (वाशीम), लिबर्टी लीगचे मकरंद डोईजड, किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब आदी पुण्याच्या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. बालगंधर्व चौक ते अलका टॉकीज मार्गे म. फुले वाडा (भवानीपेठ) अशीही पदयात्रा जाणार आहे. 

आवाहन

सरकारे बदलली पण शेतकरीविरोधी नरभक्षी कायदे तसेच कायम राहिले. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी देखील शेतकरी गुलाम आहेत. गळफास असलेल्या कायद्यांविरुद्ध कोणी आवाज उठवीत नाही. स्वातंत्र्याचा संकोच करणारे, संविधान विरोधी परिशिष्ट – 9 रद्द करण्यासाठी कोणीही प्रयत्न करीत नाही. इतिहासाने ही जबाबदारी तुमच्या आमच्यावर टाकली आहे. शेतकरी स्वातंत्र्याच्या बाजूने असलेल्या सर्वांनी आता पुढे आले पाहिजे. 18 जून 22 रोजी होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन किसानपुत्र आंदोलन करीत आहे.