काँग्रेससह वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाणी पुरवठा विस्कळीत
अंबाजोगाई : शहरातील स्वच्छता व पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. याप्रश्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे दिसून आले. पदाधिकार्यांनी नगरपरिषद कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर शुक्रवारी (दि.10) दुपारी 3 वाजता कचरा आणून फेकला. तसेच, दुषित पाण्याच्या बॉटलसमवेत कार्यालयीन अधीक्षक आत्माराम चव्हाण यांना निवेदन दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगरपरिषदेने यावर्षी काढलेले घनकचरा व्यवस्थापनाचे टेंडर वादात सापडल्याने स्वच्छता कामगार दि.1 जूनपासून कामावर दिसत नाहीत. त्यामुळे शहरात जागोजागी कचर्याचे ढिग दिसून येत आहेत. तसेच, अनेक प्रभागात नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधीमय वातावरण निर्माण होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, पिण्याचे पाणी हे 10 ते 12 दिवस विलंबाने मिळत आहे. काही भागात दुषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत.
दरम्यान, पाण्यासह मान्सूनपूर्व स्वच्छता प्रश्नी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भुमिका घेतली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे यांच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला. त्यांनी तातडीने कारभार न सुधारल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकार्यांनी दिला आहे.
यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आसिफोद्दिन खतीब, शहर कार्याध्यक्ष संजय काळे, शहर उपाध्यक्ष दयानंद कांबळे, वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष गोविंद मस्के, शहर महासचिव नितीन सरवदे, जिल्हा संघटक परमेश्वर जोगदंड, सतिष सोनवणे, लखन बलाढे, उमेश शिंदे, भगवान वाघमारे, साहेबराव सोनवणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारभार न सुधारल्यास मुख्याधिकाऱ्यांना काळे फासणार
नगरपरिषद प्रशासनाचा कारभार न सुधारल्यास वादग्रस्त मुख्याधिकारी तथा प्रशासक अशोक साबळे हे जिथे दिसतील तिथे तोंडाला काळे फासणार असा, इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आसिफोद्दिन खतीब यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.