उजनी पाटी जवळ घडली घटना
अंबाजोगाई : राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अंबाजोगाई – अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर उजणी पाटी जवळ भरधाव वेगाने असलेल्या मोटारसायकलने उभ्या असलेल्या बैलगाडीला जोराची धडक दिल्याने मोटारसायकल वरील 2 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक 10 जूनला सायंकाळी 7 च्या सुमारास घडली आहे. सुरेश नरहरी गायकवाड (वय 45, रा.किनगाव) व शेख जावेद शेख अल्लाबक्ष उर्फ पेंटर (वय 38, रा. किनगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, मयत सुरेश गायकवाड आणि शेख जावेद शेख अल्लाबक्ष हे धर्मापूरी येथे एका लग्न समारंभासाठी आले होते. लग्न आटोपून ते दोघे जण सायंकाळी मोटारसायकलने (एमएच 24 एझेड 9761) किनगाव गावांकडे निघाले होते. सायंकाळी 7 च्या सुमारास उजनी पाटी जवळ आले असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीला त्यांनी पाठीमागून जोराची धडक दिली. अपघातात मोटारसायकल चालक सुरेश गायकवाड आणि पाठीमागे बसलेले शेख जावेद शेख अल्लाबक्ष दोघेही गंभीर जखमी झाले.
अपघात पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी त्यांना तातडीने ‘स्वाराती’ रुग्णालयात दाखल केले. परंतू, तिथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रस्ते चकाचक झाल्याने वाहनं चालवताना चालकांनी वेग नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे, तरचं वाढते अपघात टाळता येतील.