अंबाजोगाईत घाणीचे साम्राज्य : नगरपरिषद‌ प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात

मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासनावर व्यक्त होतोय तीव्र संताप

अंबाजोगाई : मुख्याधिकारी आणि नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे अंबाजोगाई शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या 10 दिवसांपासून स्वच्छता कामगार कामावर आले नसून घंटागाड्याही बंद असल्याने शहरातील विविध प्रभागात कचऱ्याची विल्हेवाट न लागल्याने, नालीसफाई न झाल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले असून नगरपरिषद प्रशासन मात्र याकडे साफ दुर्लक्ष करित असल्याने मुख्याधिकारी, नगरपरिषदेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

अंबाजोगाई नगरपरिषदेत चाललंय तरी काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. नगरपरिषदेला लाखों रुपायांची घरपट्टी, नळपट्टी भरायची आणि त्या बदल्यात नगरपरिषदेने नागरिकांचा जीव धोक्यात घालायचा, असाच ‌कारभार सध्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वाखाली चालू आहे. अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने शहरातील स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखों रुपायांचे कंत्राट दिले जाते. यात कंत्राटदारांकडून शहरातील स्वच्छता, घंटागाड्याने विविध प्रभागातील कचरा गोळा करणं, नाली सफाईचे कामं करुन घेतली जातात. नगरपरिषद प्रशासनाने स्वच्छतेचे कंत्राट संपलं म्हणून घाईघाईने नवी मुंबई येथील अशोक एंटरप्रायजेस या एजन्सीला सदरिल कंत्राट दिले. आज 10 दिवस झाले तरी संबंधित कंत्राटदार शहरात फिरकलाच नाही. 

शहरातील स्वच्छतेसाठी जुन्या कंत्राटदारांकडे जवळपास 120 स्वच्छता कामगार रोजंदारीवर गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कामावर आहेत. या कामगारांनी ‌‌‌‌‌‌वाढीव रोजंदारीसाठी तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषणाचे आंदोलन केले होते.‌ यात तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी कामगारांना नवीन कंत्राटात 500 रुपये रोजंदारी देण्याचं लेखी आश्वासन दिले होते. आता ते कर्मचारी वाढीव रोजंदारीसाठी आडून बसले आहेत. नवीन कामगारांना आम्ही काम करु देणार नाहीत, असाही इशारा कामगारांनी दिला आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची सततची गैरहजेरी, कर्मचाऱ्यांत बेबनाव असल्यानं निर्णय कोणी घ्यायचा, अशी संभ्रम अवस्था मुख्याधिकाऱ्यांनी करून ठेवली आहे, याचा त्रास अंबाजोगाईकरांना भोगावा लागत आहे, त्यामुळे अंबाजोगाईकरांचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे. शहरातील विविध प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसून येत असून नालेसफाई न केल्याने दुर्गंधी पसरली आहे. 

अधिकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांची पाठराखण

अंबाजोगाई नगरपरिषदेचा‌ कारभार चव्हाट्यावर आला असून याला जबाबदार असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शहरातील बहुतांश राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी, महिला संघटनांनी उपजिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही अंबाजोगाईतील जनतेला वाऱ्यांवर सोडत मुख्याधिकाऱ्यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुका प्रशासनावरचाही जनतेचा विश्वास उडाला आहे.‌ महिलांना त्रास देणाऱ्या, शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी पाठीशी घालत असतील तर सर्वसामान्य जनतेने कोणाला दाद मागायची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.