इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल – धनंजय मुंडे

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केली स्मारक कामाची पाहणी

मुंबई : दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्धारित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात येत असून मार्च 2024 पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनीवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशि प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्चीतीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत  करण्यात आला.

स्मारक उभारणीचे काम जरी एमएमआरडीए कडे असले तरी राज्य शासनाने इंदूमिल स्मारक उभारणीच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तात्काळ एमएमआरडीए ला वितरण करण्याचे निर्देश ही मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनीवासन यांनी या परिसरात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती सादरीकरण तसेच प्रत्यक्ष भेट देवून माहिती सांगितली. प्रवेशव्दार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमएमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून उर्वरीत काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.