राज्यात महानगरपालिका, नगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजणार

मुंबई, पुण्यासह 14 महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार

नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना 7 जूनला

मुंबई : महापालिका निवडणुका केव्हा होणार याबाबत अजून अनिश्चितता असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई, पुण्यासह 14 महापालिकांची अंतिम प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर केली जाणार आहे.

निवडणुकांबाबतचे राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले काही अधिकार आपल्याकडे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवताना 15 दिवसांत निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश मागच्या आठवड्यात दिले आहेत. इम्पिरिकल डेटा सादर केल्याशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नाही व ओबीसी आरक्षण नाही, म्हणून निवडणुका रोखता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे आयोगाने मार्चमध्ये थांबवलेली प्रभाग रचनेची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.

14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून 17 तारखेला याची अंतिम घोषणा होईल. याबाबत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला सोलापूर, नाशिक, पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना आयोगाने पत्र पाठवले आहे. त्यानुसार 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण झाल्यानंतर 12 मेपर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवावे, असे कळवण्यात आले आहे. 17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

दोन टप्प्यांत होणार निवडणुका ?

महानगरपालिका निवडणुका पावसाळ्यात होणार का ? याबाबत साशंकता आहे. मात्र प्राथमिक माहितीनुसार दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झाले आहे, त्यांची निवडणूक घेतली जाणार आहे. नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना 7 जूनला

राज्यातील 216 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार असून त्यांच्या प्रभागरचनेचे कामही सुरू आहे. याचाही कार्यक्रम आयोगाने आखून दिला आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना देण्यासाठी 14 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यावर जिल्हाधिकारी 23 मेपर्यंत सुनावणी देतील. अंतिम प्रभाग रचना 7 जूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.