बर्दापुर – वाघाळा रस्त्याच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा

खा. प्रितम मुंडे यांच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचना

रखरखत्या उन्हात स्पॉट पाहणी : अपघात रोखण्यासाठी दोन दिवसात उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

अंबाजोगाई : लातूर – अंबाजोगाई मार्गावर असलेल्या बर्दापुर ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी लातूर – अंबाजोगाई मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी करताना संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आपण पाठपुरावा करत आहोत, केंद्र सरकार देखील यासाठी सकारात्मक असून संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर केल्यावर चौपदरीकरणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावू, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

अंबाजोगाई – लातूर दरम्यान असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांपूर्वी ट्रक आणि जीपच्या भीषण अपघातात मोठी जिवीतहानी झाली होती, या अपघाताची माहिती मिळताच खा. प्रितम मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या, आज प्रत्यक्ष दुर्घटनास्थळाची पाहणी करून अपघात रोखण्यासाठी दोन दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी अपघात प्रवण क्षेत्राच्या दोन्ही बाजूनी सूचना फलक व गतिरोधक बसवण्याची सूचना देऊन सर्व प्रक्रिया एका आठवड्यात पूर्ण करण्याची तंबी त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.

राष्ट्रीय महामार्गासंबंधित प्रश्नांवर वेळोवेळी बैठक घेऊन जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्र अर्थात ब्लॅक स्पॉट ओळखून त्याठिकाणी सूचना फलक उभारण्यात यावेत व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आपण संबंधित विभागांना सातत्याने देतो आहोत, परंतु आजपर्यंत लातूर – अंबाजोगाई मार्गावरील अपघात प्रवण क्षेत्र चिन्हीत करण्यात आले नाही हे विभागाचे अपयश असल्याचे खा. प्रितम मुंडे म्हणाल्या.

रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी खा. मुंडेंनी केली गडकरींशी चर्चा

लातूर – अंबाजोगाई मार्गावरील बर्दापुर ते वाघाळा दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर खा. मुंडे यांनी नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधला, चौपदरीकरणाचा प्रस्ताव दाखल करा, आवश्यक प्रक्रिया पूर्ण होताच प्रश्न मार्गी लावू व दिल्लीत आल्यावर याविषयी अधिक चर्चा करू, असा सकारात्मक प्रतिसाद नितीन गडकरी यांनी खा. मुंडे यांना दिला.