बीड : अक्षय तृतीया, रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती तसेच भगवान परशुराम जयंती हे उत्सव एकाच दिवशी येणे म्हणजे गंगा जमुना तहजीब जपणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीत सामाजिक एकोपा जपण्याचा नियतीनेच दिलेला संदेश आहे, असे मत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
धनंजय मुंडे यांनी बीड, परभणी जिल्ह्यांसह राज्यातील जनतेला अक्षय तृतीया, रमजान ईद, महात्मा बसवेश्वर जयंती तसेच भगवान परशुराम जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सामाजिक एकोपा अबाधित राखून शांततेत सण साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
अलीकडच्या काळात पवित्र रमजानचा महिना सुरू असताना काहीजण समाजात जाती -धर्मांचे राजकारण आणून माथी भडकवण्याचे राजकीय षडयंत्र आखत आहेत. कुणाच्या भडकावू बोलण्याला बळी पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी सर्व नागरिकांनी या सणांच्या काळात घ्यावी, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीया, पवित्र रमजान ईद, महात्मा बसवेश्वरांची जयंती, भगवान परशुरामांची जयंती हे सण नियतीने एकाच दिवशी आणले आहे, सामाजिक सलोखा अबाधित राखत हे सण साजरे केले पाहिजे, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.