सामाजिक बांधिलकी जोपासत महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी करा – विनोद पोखरकर

अंबाजोगाई : अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यासह मराठवाड्यात वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी यावर्षी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करावे आणि जयंती उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी केले आहे.

अंबाजोगाईत नुकतीच बसव ब्रिगेड संघटनेचे पदाधिकारी, वीरशैव लिंगायत समाजातील युवक यांची बैठक होवून या बैठकीत बोलताना अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी आवाहन केले की, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त लिंगायत समाज बांधवांनी व बसवप्रेमी जनतेने विविध सामाजिक उपक्रम, विधायक कार्यक्रम आयोजित करावेत, कोरोना संसर्ग काही प्रमाणात अद्यापही कायम आहे. तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य ते पालन करून सार्वजनिक स्वरूपात जयंती साजरी करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोखरकर यांनी केले आहे.

वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या व वीरशैव लिंगायत समाजाची सर्वांत प्रभावी आणि एक आक्रमक तसेच लोकशाही पद्धतीने चालणारी बसव ब्रिगेड ही राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना आहे. वीरशैव समाज बांधवांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे कार्य करणारी संघटना म्हणून बसव ब्रिगेड सर्वपरिचित आहे. 

बसव ब्रिगेडकडून मराठवाड्यासह संपूर्ण देशात व राज्यभर दरवर्षी साजरी होणारी क्रांतिसूर्य जगतज्योती महात्मा बस्वेश्वर यांचा जयंती उत्सव यंदा विविध उपक्रम आयोजित करून उत्साहात साजरी करण्यात यावा.  महात्मा बसवेश्वर यांचा जयंती उत्सव 3 मे 2022 रोजी सकाळी ठिक 10 : 30 वाजता शक्य झाल्यास सार्वजनिक आणि प्रसंगी आपापल्या घरीही साजरा करून सोशल मिडीया, फेसबुकवर जयंती उत्सवाचे फोटो अपलोड करावेत, असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत युवा मंच बसव ब्रिगेडचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी मराठवाड्यातील तमाम वीरशैव – लिंगायत समाजबांधव, महात्मा बसवेश्वर प्रेमींना व बसव ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.