अंबाजोगाई – लातूर महामार्गावर पुन्हा अपघात : दोघांचा मृत्यू, ट्रकला – इनोव्हा धडकली, 7 जण जखमी

अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दिनांक 30 एप्रिलला शनिवारी सायंकाळी 9 च्या सुमारास नंदगोपाल डेअरी समोर घडली आहे तर याच मार्गावर अवघ्या दोन तासांनी ट्रकला – इनोव्हा गाडी धडकल्याने 7 जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – लातूर महामार्गावर नंदगोपाल डेअरी जवळ दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला. श्रीराम राठोड आणि वाजीद बागवान अशी अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावं आहेत तर बर्दापूर जवळ ट्रकला – इनोव्हा गाडी धडकल्याने 7 जण जखमी झाले आहेत. 

यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा अपघात रात्री 10 ते 11 च्या दरम्यान घडला आहे. अपघातातील जखमींची नावं अद्याप समजू शकलेले नाहीत. सर्व जखमी लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सदरिल घटनेचा तपास करित आहेत.

अंबाजोगाई – लातूर महामार्ग अरुंद रस्त्यामुळे आणि डिवायडर नसल्याने लोकांच्या जीवांवर उठला आहे. बीड हद्दीपासून लोकांचे जीव महत्त्वाचे असतील तर या रस्त्याचे रुंदीकरण करणे आणि डिवायडर बसविणे गरजेचे बनले आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी शक्य तितक्या लवकर पाठपुरावा करणं गरजेचं आहे.