जनतेची मागणी आणि अपघाताची दिली माहिती
सकारात्मकतेने लक्ष घालू : गडकरींनी दिला विश्र्वास
अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर (548) या राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्हा हद्दीतील बर्दापूर फाटा – लोखंडी सावरगाव रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात यावे, या जनतेच्या मागणीसाठी पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी थेट केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करत संवाद साधला.
बर्दापूर फाटा – लोखंडी सावरगाव या रस्त्यावर डिवायडर नसल्यामुळे होणाऱ्या अपघाताची माहिती ना. मुंडेंनी गडकरींना दिली. गडकरींनी देखील या रस्त्याबाबत सविस्तर माहिती घेऊन याकडे सकारात्मकतेने लक्ष घालू, असा विश्वास दिला आहे.
अंबाजोगाई – लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील बीड जिल्हा हद्दीतील बर्दापूर फाटा – लोखंडी सावरगाव हा 38 किलोमीटरचा रस्ता वाहनचालकांसाठी आणि जनतेसाठी जीवघेणा बनला आहे. या रस्त्यावरून वाहनं चालवताना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ जनतेवर येत आहे.
24 एप्रिलला या रस्त्यावर क्रुझर – ट्रकचा भीषण अपघात होऊन 8 जण जागीच ठार झाले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये बर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 40 तर अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत 15 असे एकूण 55 जणांचा बळी झालेल्या भीषण अपघातांमध्ये गेला आहे.
बर्दापूर फाटा – लोखंडी सावरगाव या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी गेल्या दोन वर्षांपासून माध्यमांनी आणि या भागातील जनतेनी मागणी लावून धरली आहे. या मागणीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गांभीर्याने दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींना स्वतः फोन करून बीड जिल्हा हद्दीतील बर्दापूर फाटा – लोखंडी फाटा या रस्त्याचे चौपदरीकरण करावे, जेणेकरून अपघात थांबतील, अशी मागणी केली आहे.