अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच : टँकरच्या धडकेत महिलेचा मृत्यू

चालक फरार : पोलिस घटनास्थळी दाखल

अंबाजोगाई : अंबाजोगाई – लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात आज दिनांक ‌3 मे ला दुपारी 4 च्या सुमारास घडला.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई – लातूर महामार्गावर सेलुअंबा टोलनाक्याजवळ भरधाव वेगाने असलेल्या टँकरने मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होताच टँकरचा चालक फरार झाला असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. दरम्यान मयत झालेल्या महिलेची अद्याप ओळख पटली नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

अंबाजोगाई – लातूर महामार्ग अरुंद रस्त्यामुळे आणि डिवायडर नसल्याने लोकांच्या जीवांवर उठला आहे. बीड हद्दीपासून लोकांचे जीव महत्त्वाचे असतील तर या रस्त्याचे रुंदीकरण करणे आणि डिवायडर बसविणे गरजेचे बनले आहे. लोकप्रतिनिधींनी यासाठी शक्य तितक्या लवकर पाठपुरावा करणं गरजेचं आहे.