स्व. बाळासाहेब ठाकरे मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून जिल्ह्यातील 23 ग्रामपंचायतींच्या बांधकामास शासनाची मान्यता
मुंबई : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यातील स्वतःची इमारत नसलेल्या तेवीस ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत मिळणार असून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृति मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत 23 ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास ग्रामविकास विभागाने मान्यता प्रदान केली आहे.
याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, सदर इमारतींचे बांधकाम पुढील एक वर्षाच्या आत पूर्ण केले जावे, तसेच बांधकाम करताना ग्रीन बिल्डिंग संकल्पना अमलात आणून नैसर्गिक प्रकाशयोजना वायुजीवन, पाणी व ऊर्जेचा काटकसरीने वापर, जल पुनर्भरण असे पर्यावरण पूरक पद्धतीने पूर्ण केले जावे, असे या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
या निर्णयानुसार परळी तालुक्यातील पांगरी, नाथरा, पौळ पिंप्री तसेच अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर आणि सातेफळ तसेच शिरूर का. तालुक्यातील घाटशीळपारगाव, पाटोदा तालुक्यातील कुसळंब आणि अनपटवाडी, त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील चिंचाळा आणि खुंटेफळ, बीड तालुक्यातील साक्षाळ पिंपरी, चौसाळा, नाळवंडी, लिंबागणेश, जेबा पिंपरी, खर्डेवाडी, येळम घाट, डोईफोडवाडी, वडवणी तालुक्यातील देवळा व बाहेगव्हाण धारुर तालुक्यातील आमला आणि माजलगाव तालुक्यातील सुलतानपूर व टालेवाडी या गावांच्या ग्रामपंचायत बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे.