विहिरीत पडलेल्या अजगराला सुरक्षित काढले बाहेर
अंबाजोगाई : मौजे अंबलवाडी येथील वनक्षेत्राजवळील एका विहिरीमध्ये पडलेल्या अजगराला वनविभागाचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि अंबाजोगाईतील सर्पमित्राच्या सर्वांच्या सहकार्याने सुरक्षितपणे विहीरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची यशस्वी कामगिरी केल्यामुळे दुर्मीळ प्रजातीच्या अजगराला जीवदान मिळाले आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी अंबलवाडी फॉरेस्ट सर्वे नं. 5 या वनक्षेत्राजवळील रामभाऊ गोविंद काळे यांना त्यांच्या शेतामध्ये असलेल्या विहिरीमध्ये एक अजगर असल्याचे आढळून आले. तीव्र उन्हामुळे पाण्याच्या शोधात हा अजगर विहीरीत पडला होता. त्यांनी या बाबतची माहिती वनपाल जी. बी. कस्तुरे यांना कळवली. वनपाल कस्तुरे यांनी वनविभागाचे परळी विभागाचे वनक्षेत्रपाल बी. एस. गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली अंबलवाडी वनविभागाचे सर्व कर्मचारी आणि अंबाजोगाई येथील सर्पमित्र प्रा. डॉ. राजकुमार थोरात यांच्याशी संपर्क करून अजगराला विहीरीतून काढण्यासाठीचे नियोजन केले.
दिनांक 10 एप्रिलला सकाळी दहा वाजता सर्पमित्र डॉ. थोरात आणि हेमंत धानोरकर यांच्यासह वनपाल कस्तुरे आणि त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी अंबलवाडी शिवारातील काळे यांच्या विहिरीजवळ पोचले. या 50 फूट खोल विहीरीस पायऱ्या नसल्याने अजगरापर्यंत सहजपणे पोचणे शक्य नव्हते. विहिरीत पडलेल्या अजगरास बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने विविध प्रकारचे प्रयत्न करण्यात आले.
शेवटी विहीरीत उतरूनच अजगराला बाहेर काढणे हाच पर्याय शिल्लक होता. सर्पमित्र हेमंत धानोरकर यांनी गावकऱ्यांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने विहिरीत उतरून 9 फूट लांबीच्या या अजगरास सुरक्षितपणे पोत्यात घालून विहिरीबाहेर काढले. विहीरीतून बाहेर काढल्यानंतर लगेच वनपाल कस्तुरे आणि उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने अजगरास सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात पोचवण्यात आले.
या प्रसंगी वनविभागाचे अंबलवाडी क्षेत्राचे वनरक्षक बी.आर दहिफळे, अंबलवाडीे गावचे वनमजूर बी. एस. गित्ते, वनमजूर विनोद गित्ते (तळणी) हे कर्मचारी उपस्थित होते. तसेच अंबलवाडीे गावातील नारायण हरिभाऊ पोते, केशव नारायण गर्जे, बालाजी माणिक गर्जे, बालाजी श्रीरंग गित्ते यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या सर्वांच्या सहकार्यामुळेच अजगराला जीवदान मिळाले.