ख्यातनाम गायक वैभव खुनेंच्या भिमगीतांच्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
अंबाजोगाई : ‘आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे’ यासह सादर केलेल्या ख्यातनाम गायक वैभव खुनेंच्या भिमगीतांनी अंबाजोगाईकरांना आनंदीत केले. भीम अनुयायांनी ही त्यांच्या प्रत्येक गाण्याला दाद देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शहरातील फ्लावर्स क्वार्टरमधील फ्रेंड्स क्ल्बच्या वतीने महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वैभव खुने यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 10 एप्रिलला रविवारी परिसरात करण्यात आले होते.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या भयंकर सावटानंतर यावर्षी सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दोन वर्षांनंतर गायक वैभव खुने यांचा अंबाजोगाईत पहिलाच भीमगीतांचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनीही तितक्याच उत्साहात आणि जल्लोषात कार्यक्रम सादर केला.

गायक वैभव खुनेंची महाराष्ट्रात भीमगीतं लोकप्रिय आहेत. ‘तुला माणसात आणलया कुणी, माझ्या भीमानं’, आमचा नादचं खुळा, साऱ्या जगा वेगळा, डौलानं डोलतयां झेंडा तो निळा’, या जोषपूर्ण गाण्यांनी तर युवकांना आणि ज्येष्ठांना ठेका धरायला भाग पाडले. ‘माझ्या कुंकवाच्या खाली, भीम मुर्ती आहे गोंदली’ या रमाई गीताने उपस्थित महिलां भगिनीत भावनिक वातावरण निर्माण झाले. या गाण्याला महिला भगिनींनी विशेष दाद दिली.
‘भारताचा घटनाकार, झाला माझा भिमराया’, ‘गावांमध्ये गाव आहे ते महु गांव, तिथे जन्मले भीमराव सखे बाईगं’ या गाण्यांना तर युवकांनी अक्षरक्ष: डोक्यावर घेत ठेका धरत जल्लोष केला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट संगीत संयोजन आणि खुनेंच्या शेरोशायरीने भीम अनुयायी भारावून गेले. वैभव खुनेंना तबला – धम्मपाल दांडेकर, समाधान राऊत, ढोलक – विशाल गायकवाड, बॅन्जो – गुंडेकर यांच्यासह आदींनी साथसंगत केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी फ्लावर्स क्वार्टरमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र मोरे यांनी केले. व्यासपीठावर सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी भिमजयंती उत्सव समिती, फ्रेंड्स क्ल्ब फ्लावर्स क्वार्टरच्या सर्व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. वैभव खुनेंच्या कार्यक्रमासाठी शहरांसह आसपासच्या गावातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.