माजी सरपंचाच्या आईचा अंत्यविधी केला रस्त्यावर
घाटनांदूर : चौथेवाडी गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बुधवारी (दि. 6) एका वृद्ध महिलेचा अंत्यविधी चक्क रस्त्यावर करावा लागला. माजी सरपंचांच्या आईचा अंत्यविधी सकाळी अकरा वाजता रस्त्यावर उरकण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्ष झाले. स्वातंत्र्य भारतात आपण आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत असताना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील खेडेगावात पिण्याचे पाणी, उत्तम शिक्षण, आरोग्य सुविधा, वीज, रस्ते या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने जिवंतपणी ग्रामीण भागातील ग्रामस्थांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मरणानंतर ही परवड सुरूच आहे. त्यामुळे गावातून ग्रामस्थ शहराकडे स्थलांतर करत आहेत.
अंबाजोगाई तालुक्यातील 1200 लोकसंख्या व 110 घरे असलेल्या चौथेवाडी या गावात हटकर, मराठा, मातंग, बौद्ध, मुस्लिम समाजाचे घरे आहेत. या गावात अजूनही स्मशानभूमीला जागा उपलब्ध होत नाही.गावात बहुसंख्येने असलेल्या हटकर व मराठा समाजातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास ज्यांना शेती आहे, त्यांचा अंत्यविधी शेतात करण्यात येतो. परंतु, पावसाळ्यात शेतात अंत्यविधी करताना अनंत अडचणीला तोंड द्यावे लागते. तर बौद्ध, मातंग समाजातील कुटुंबात शेती व स्मशानभूमी नसल्याने त्यांचा अंत्यविधी रस्त्यावर करावा लागतो.
येथील माजी सरपंच लक्ष्मण मिसाळ यांच्या मातोश्री धोंडाबाई रानबा मिसाळ (वय 90) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. स्मशानभूमी नसल्याने बुधवारी सकाळी अकरा वाजता चौथवाडी – घाटनांदूर रस्त्यावर अंत्यविधी उरकण्यात आला. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामीण भागात ग्रामस्थांची मृत्यूनंतरही परवड थांबत नसल्याचे पाहवयास मिळत आहे.
प्रशासनाने या विषयी गांभीर्याने दखल घेवून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशा मागणीचे निवेदन आज दिनांक 7 एप्रिलला गुरुवारी विवेक विचार मंच, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी मंचाचे औरंगाबाद विभागाचे समन्वयक ऋषीकेश सकनूर, महेंद्र उजगरे, अविनाश उखांडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
सर्व जाती – धर्माच्या ग्रामस्थांचा अंत्यविधी करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायतच्या वतीने वेळोवेळी महसूल प्रशासनास निवेदन देण्यात आले आहेत. परंतु, आजपर्यंत जागा उपलब्ध झाली नाही. गेल्या वर्षी स्मशानभूमीचे शेड बांधण्यासाठी तीन लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. जागेअभावी निधी पडून आहे. – बी. एच. भोसले, ग्रामसेवक, चौथेवाडी