अंबाजोगाई : अंबाजोगाई पिपल्स को. ऑप. बँक सन 2022 हे वर्ष रौप्य महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने बँकेकडून अर्थकारणासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम अंबाजोगाईकरांसाठी राबविल्या जात आहेत. या उपक्रमांतील सांस्कृतिक पर्व ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मराठी कलाविष्काराचा बहारदार कार्यक्रम नुकताच शहरातील आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात पार पडला. यात असलेल्या कलाकारांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांने अंबाजोगाईकरांची मने जिंकली. एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन कलावंतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील मराठी मातीतील कलाविष्कार सादर करण्यात आले. यात वासुदेव, पोतराज, भारुड, लावणी, शाहीरी, पोवाडा, मराठी प्रबोधन गीते, चित्रपट गीते, गोंधळ, लावणी, कोळीगीत यासह आदी गाण्यांचा समावेश होता.

या कार्यक्रमाचा प्रारंभ अंबाजोगाई पिपल्स को. ऑप. बँकेचे चेअरमन राजकिशोर मोदी यांच्याहस्ते कलावंतांचा सत्कार करुन करण्यात आला. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश सोळंकी, संचालक प्रा. वसंत चव्हाण, पुरुषोत्तम चोकडा, अरुण काळे, नगरसेवक मनोज लखेरा, सुनिल व्यवहारे, दिनकर जोशी, धम्मा सरवदे, संतोष शिनगारे, डॉ नरेंद्र काळे, तानाजी देशमुख यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुंबई येथील कलावंतांनी आपल्या कलाविष्काराच्या माध्यमातून अंबाजोगाईकरांची मने जिंकत कधी धीर – गंभीर केले तर कधी खळखळून हसायला भाग पाडले. मुंबईचा हा कलाविष्कार अंबाजोगाईकरांनी डोक्यावर घेत मोदी यांच्या उपक्रमाचे अभिनंदन व कौतुक केले.
‘मराठी पाऊल पडते पुढे’ महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमात वय वर्ष 18 वरुन 78 वर्षापर्यंतच्या कलाकारांनी आपली कला सादर केली. उदय साटम निर्मित या कार्यक्रमात महत्वपूर्ण अशा निवेदकाची बाजू दत्ता चाळके यांनी उत्तमरित्या पार पाडली. संगीत संयोजन सचिन घाग, शरद वाणी, पार्थ पाटील, रवी खानविलकर, अनिकेत गंगावणे यांनी सांभाळले तर कार्यक्रमात गायक म्हणून दिनेश नादकर, ऋषी मेस्त्री, दर्शन साटम तर गायिका उमा गावड, श्रद्धा साळवी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने अंबाजोगाईकरांवर जादू केली.

लावणीवर ठेका अंबिका पुजारी यांनी धरला. नृत्य सादर करणारे स्वाती बडेकर, प्रियंका कोरी, पूजा मोहिते, मोहिनी पवार, नैना परुळेकर, निलेश पंडव, राजेश शिर्के, नंदू कदम, उज्वेश यांनी आपल्या नृत्याविष्काराने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नृत्य दिग्दर्शन संदिप कांबळे यांनी सांभाळले. अंबाजोगाई शहर व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला, पुरुष, नगरसेवक, बँकेचे संचालक, पत्रकार मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.