डॉ. इंद्रजित भगत यांच्या ‘अनोरा’ या संपादित पुस्तकाचे प्रकाशन

अंबाजोगाई : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. इंद्रजित रामदास भगत यांच्या ‘अनोरा’ या संपादित पुस्तकाचे प्रकाशन दिनांक 26 मार्च 2022 रोजी करण्यात आले. ‘अनोरा’ या संपादित पुस्तकासाठी देशभरातून महिला सक्षमीकरण संबंधित उपक्रमांतर्गत लेख मागविण्यात आले होते. या पुस्तकाला प्रतिसादात देशभरातून 18 राज्यांमधून एकूण 50 लेखकांनी 40 लेख पाठविले. 

या पुस्तकाकरिता जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासनात व नेतृत्वात महिलांचे स्थान : महिलांना भविष्यात जगात समानता प्राप्तीसाठी संधी हा मुख्य विषय समोर ठेवून लेख मागविण्यात आले होते. ‘अनोरा’ पुस्तकाला माजी संचालक डॉ. टि. आर. पाटील यांची प्रस्तावना तर संचालक, डॉ. आनंद देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या. 

पुस्तकाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे व उद्घाटक प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी संशोधनातून सामाजिक सुधारणांकरिता दिशा प्राप्त होते, असे सांगताना विद्यार्थ्यांनी संशोधन कार्यात आवड निर्माण करावी व नवीन संशोधनातून देशाच्या समस्या व समृद्धीकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पुस्तकाचे प्रकाशक समिक्षा पब्लिकेशन, पंढरपूर येथील प्रवीण अनिलराव भाकरे तर पुस्तक छपाई करिता सचिन कुलकर्णी, एक्सेल प्रिंटिंग प्रेस, पुणे यांचे सहकार्य लाभले. संपादित पुस्तकाचे मुद्रण नितीन मस्के यांनी केले.

या प्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाठ, राजेसाहेब औताडे, श्रीमती प्रतिभा देशमुख, सय्यद पाशू करीम, भाऊसाहेब गोविंद औताडे, उपप्राचार्य प्रा. प्रताप जाधव, नागेश जोंधळे, डॉ. दिलीप भिसे, डॉ. अनंत मरकाळें, डॉ. सुरेश पाटील, डॉ. संजय जाधव, डॉ. अरविंद घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उपस्थिती दर्शवली. डॉ इंद्रजित भगत यांना भविष्यातील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.