मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अंबाजोगाई : केंद्र व राज्य सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी व भांडवलदार धार्जिणी‌ धोरणाच्या विरोधात संपूर्ण देशातील कामगारांच्या वतीने 28 आणि 29 मार्चला आंदोलनं हाती घेण्यात आली आहेत. याचाच भाग म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, शाखा अंबाजोगाईच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आशा वर्कर्स युनियन, शालेय पोषण आहार कामगार संघटना, डिवायएफआय युवक संघटनेच्या वतीने आज मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात कामगारविरोधी चार श्रम संहिता रद्द करा, नफ्यात चाललेल्या सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण थांबवा, पेट्रोल – डिझेल – गॅसची जीवघेणी भाववाढ त्वरित मागे घ्या, आशा – गटप्रवर्तक, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी यांना किमान वेतन 26 हजार रुपये करा, राष्ट्रीय अभियान कायम करा, शालेय पोषण आहार कामगारास कायमची नियुक्तीपत्रे द्या, बांधकाम कामगारास मिळणारे सर्व लाभ त्याचा अर्ज मिळाल्यावर तात्काळ द्या यासह अन्य मागण्यां करण्यात आलेल्या आहेत.

या प्रसंगी माकपचे जिल्हा सचिव कॉ. अजय बुरांडे, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, प्रशांत मस्के, देविदास जाधव, सिताराम थोरात, भागवत जाधव, सुहास चंदनशिव, कीर्ती कुंटे, सविता होके, अनिता सुरवसे, उत्तरेश्वर हुलगे, रुक्मिणीबाई नागरगोजे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.