अभिनंदनीय : मजुराच्या मुलीची लंडनच्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड

अंबाजोगाईच्या अस्मिता बनसोडेचे सर्वत्र कौतुक

अंबाजोगाई : येथील बोधीघाट परिसरात राहणाऱ्या अस्मिता सिद्धार्थ बनसोडे हिची लंडनच्या विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत तिने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

अस्मिताचे वडील सिद्धार्थ बनसोडे हे मजुरी करून कुटुंबाची गुजराण करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी सिद्धार्थ यांनी अस्मिताच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. अस्मिताचे शालेय शिक्षण गोदावरीबाई कुंकूलोळ शाळेत झाले तर, तिने बीएचे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर तिने पुण्याच्या सावित्रीमाई फुले विद्यापीठातून राज्यशास्त्रात एमए पदवी घेतली. 

उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने लंडन येथील एसओएएस विद्यापीठात अर्ज केला होता. अस्मिताची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता सदरिल विद्यापीठाने तिची ‘एमएससी डेवलपमेंट स्टडीज’ या अभ्यासक्रमासाठी निवड केली आहे. हा अभ्यासक्रम दोन वर्षाचा असून त्याद्वारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळू शकते. 

दरम्यान, हा अभ्यासक्रम पूर्ण करून महिलांच्या प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याचा मानस अस्मिताने बोलून दाखवला. तिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.