कित्येक वर्षांपासून दुरुस्ती नाही : जंगलाचे आले स्वरुप
कर्मचाऱ्यांना होतोय त्रास : प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
महादेव अ. गोरे
अंबाजोगाई : आशिया खंडात ग्रामीण भागातील सर्वात मोठं रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या ‘स्वाराती’ च्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची अवस्था अत्यंत बकाल झाली असून अनेक इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांकडे दुर्लक्ष झाल्याने परिसराला जंगलाचे स्वरुप आले आहे. याचा मोठा त्रास या परिसरातील कर्मचाऱ्यांना होतं असून वेळोवेळी अर्ज, निवेदने देऊन देखील गेल्या कित्येक वर्षांपासून निवासस्थानांच्या समस्या ‘जैसे थे’ चं आहेत.
‘स्वाराती’ रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना 1975 साली झाली. त्याअगोदर येथील रुग्णालय मराठवाड्यातील सर्वात मोठं क्षयरोगावरील उपचाराचे महत्त्वाचं केंद्र होतं. क्षयरोगावरील उपचारांसाठी विविध भागातून या ठिकाणी रुग्ण येत असतं. क्षयरोग रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्याकाळी निवासस्थानं बांधण्यात आली. ती निवासस्थानं आज ‘स्वाराती’ रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आहेत. त्या काळापासून आजतागायत या निवासस्थानांची थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली आहे. काहींच्या मते ही निजामकालीन निवासस्थानं आहेत, असेही बोलल्या जाते. परंतू आज ही निवासस्थानं अनेक समस्यांनी ग्रासले आहेत. एकेकाळी ‘स्वाराती’ च्या वैभवात भर घालणाऱ्या या परिसराला जंगलाचे स्वरुप आले आहे.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी ही निवासस्थानं राहण्यायोग्य नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी निवासस्थानं सोडली असून किरायाच्या घरात ते राहण्यासाठी गेले आहेत. ‘स्वाराती’ प्रशासनाकडे, बांधकाम विभागाकडे अनेकवेळा या कर्मचाऱ्यांनी अर्ज, निवेदने दिली, परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे कर्मचारीही आहे त्या परिस्थितीत राहातं आहेत.
‘स्वाराती’ रुग्णालयाच्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा परिसर फार मोठा आहे. या ठिकाणी जवळपास 217 निवासस्थानं आहेत. यापैकी जवळपास बहुतांश निवासस्थानांची अवस्था दयनीय असून ते मोडकळीस आलेली आहेत. जागोजागी परिसरात बाभळीच्या झाडांची मोठी वाढ झाली असून घाणीचं साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे जे कर्मचारी रुग्णालयात दिवसभर काम करत रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांच्याच मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
‘स्वाराती’ रुग्णालयाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेकवेळा लोकप्रतिनिधी रुग्णालयात आढावा बैठक घेतात. परंतू, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जाते. रुग्णालय परिसरात आज टोलेजंग इमारतींची बांधकामे चालू आहेत. परंतू, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने यावर छदामही खर्च होत नाही. या भागातील आमदार, लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत निवासस्थानांची झालेली बकाल अवस्था दूर करून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देत परिसराला गतवैभव प्राप्त करून द्यावेत, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.