मातोश्री पांदण रस्ता योजनेतून मिळणार निधी
बीड : बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेत वस्त्या व वाड्या पांदण रस्त्याच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांना जोडले जावेत, या उद्देशाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मातोश्री ग्राम समृद्धी शेत – पांदण रस्ते योजनेअंतर्गत सुमारे 1050 किमी अंतराच्या रस्त्यांसाठी 251 कोटी रुपये निधी खेचून आणला आहे.
पूर्वी दि. 25 जानेवारीला यांपैकी 243 किमी लांबीच्या सुमारे 58 कोटींच्या रस्त्यांना या योजनेंतर्गत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेल्या मागणीतून आणखी 806 किमी लांबीच्या रस्त्यांसाठी आणखी 193 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ही कामे सन 2021 – 22 व सन 2022 – 23 या दोन आर्थिक वर्षात मिळून पावसाळ्यापूर्वी किंवा पावसाळ्यानंतर पूर्ण केली जावीत, असे आदेश नियोजन विभागाने निर्गमित केले आहेत.
बीड जिल्ह्यात ग्रामीण रस्त्यांना मुख्य मार्गांशी जोडले जावे, खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जावी, यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून याआधी जवळपास 200 कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यापाठोपाठ आता सुमारे 600 गावातील 1050 किमी लांबीच्या रस्त्यांना मातोश्री ग्राम समृद्धी शेत – पांदण रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
दरम्यान बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात शक्य त्या ठिकाणी शेत वस्त्या – पांदण रस्ते तयार करून वादविवाद रहित शेती मालाची वाहतूक व प्राधान्याचे दळणवळण सुरू व्हावे, यादृष्टीने पांदण रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात येत आहे. ही कामे मनरेगा व रोहयो यांच्या अभिसरणातून व राज्य रोहयोमधून पूरक कुशल अनुदान उपलब्ध करून खरीप हंगामातील पेरणीपूर्वी किंवा काढणीनंतर पूर्ण करण्यात येतील.
तसेच या योजनेंतर्गत आणखी काही रस्त्यांच्या कामांना आगामी काळात मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील शेत – पांदण रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार तसेच रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री ना. संदीपान भुमरे पाटील यांचे आभार मानले आहेत.