नगरपरिषद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा – सुनिल लोमटे

अंबाजोगाई : शहरातील नगरपरिषद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने 6 जणांचा चावा घेतला आहे. ही घटना आज दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान शहरातील मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे सुनिल लोमटे यांनी केली आहे.

अंबाजोगाईत गेल्या काही दिवसांपूर्वीच नगरपरिषद परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने अनेकांचा चावा घेतला होता. आजही नगरपरिषदेत कामानिमित्त आलेल्या नागरिकांचा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला. या सर्वांवर ‘स्वाराती’ रुग्णालयात उपचार करण्यात आले. सय्यद अत्तर, चंद्रशेखर देशमुख, रवी गव्हाणे, सोमेश्वर ढोणे, उमेश शिंदे आणि दत्ता सोनवणे अशी कुत्र्याने चावा घेतलेल्यांची नावे आहेत.

पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा

अंबाजोगाई शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्याची ही दुसरी घटना आहे. नगरपरिषदेने पिसाळलेल्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपाचे सुनिल लोमटे यांनी केली आहे.