विनोद रापतवार
गोदावरीचा वेढा ज्या गावापासून थोडया अंतराने पुढे सरकत जातो, त्यापैकी नाळेश्वर हे एक गाव. तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गोदावरीने जे सुपीक काठ दिलेले आहेत ते काठ नाळेश्वरच्या वाट्याला आले.
नैसर्गिक सुबत्ता असूनही अल्पभुधारक शेतकऱ्यांना फारसे काही हाती लागेलच याची मात्र श्वाश्वती नाही. वरचेवर पिढ्याप्रमाणे होत आलेल्या शेतीच्या वाटण्यामुळे शेतीचे अधिक छोटे – छोटे तुकडे पडत गेले. या छोट्या तुकड्यात शेती करायची कशी हा प्रश्न असंख्य शेतकऱ्यांप्रमाणे नाळेश्वरच्या मैठे दांपत्यालाही पडला नसेल तर नवल ! छोटया शेतीत संसार भागवताना आलेल्या आव्हानाबाबत सुरेखाताई मैठे ओल्या डोळयाने खूप काही सांगत होत्या.
हौसेने मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी सुरु असलेली धडपड, त्यांना लागणाऱ्या टयुशन फिसच्या मोठया रकमा, नांदेड जवळ असल्याने जे काही अधिक चांगले असेल ते मुलांना मिळावं यासाठी मनाची होणारी घालमेल असे सारे काही त्या बोलत होत्या. अडीच तीन एकरात नेमके भागवायचे कसे, याचे उत्तर त्यांना सापडत नव्हते. सुरेखाताईनी आपल्या अडीच एकर शेतीवर स्वप्न पाहणे थाबंवले नाही.
एक दिवस ‘माविम’ तर्फे महिला बचत गटांच्या माध्यमातून या गावात काही करता येईल का, याच्या चाचपणीसाठी नाळेश्वरला ‘माविम’ चे समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड गेले होते. अधिक श्वाश्वत उत्पनाच्या प्रयत्नात असलेल्या सुरेखाताई यांनी त्यांची भेट घेतली. बचत गटाच्या माध्यमातून खूप काही होवू शकते, हा विश्वास राठोड यांनी त्यांना दिला. यातूनच पुढे आदिशक्ती महिला बचतगट साकारला. महिला आर्थिक विकास महामंडळाने या गटाला किराणा दुकानासाठी एक लाख पंच्याहत्तर हजार रक्कम बँकेमार्फत मिळवून दिली.
या व्यवसायातून सुरेखाताईसह इतर नऊजणी खऱ्या अर्थाने आदिशक्ती झाल्या. घेतलेल्या कर्जाची रक्कम सुरेखाताईनी आपल्या कौशल्यातून एका वर्षातच फेडून टाकली. यांच्या जोडीला पिठाची गिरणी सुरु केली. गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेडही त्यांनी नियमितपणे पूर्ण केली.
संसारासाठी शेतीवरचा आर्थिक ताण सुरेखाताईनी इतर व्यवसायातून दूर केल्याने त्यांचे पती संभाजी मैठे यांनी आपल्या 90 गुठयांवर निशिगंधासह गुलाब शेतीचे स्वप्न पाहिले. ‘फुलांची शेती करायला सोपी नाही. खूप जीव लावावा लागतो झाडांवर, मग तेव्हा निशिगंध आणि गुलाब फुलतात’ या शब्दात सुरेखाताई शेतीतल्या अनुभवी ज्ञानालाही बोलता – बोलता वाटून जातात. 90 गुंठ्यांच्या फुल शेतीत या दोघांनी गुलाब, निशिगंध, गलांडा, बिजली फुल लावले. यात 20 गुंठ्यांवर गुलाब, 30 गुंठ्यांच्या निशिगंध, 20 गुंठ्यांचा गलांडा, 20 गुंठ्यांवर बिजली फुले लावून त्यांनी महिण्याच्या उत्पादनाचे गणित बसविले.
फुलांना महिण्यातून तीनदा फवारणी त्यांना करावी लागते. एका फवारणीला एक हजार याप्रमाणे तीन फवारणीला तीन हजार, खतासाठी दोन हजार असे महिण्याला पाच हजार त्यांना खर्च करावे लागतात. नांदेड येथे रोजची फुले घेवून जाण्या – येण्यासाठी दिवसाला दोनशे रुपये असे महिण्याला साधारणत: काही खाडे पकडून पाच हजार रुपयांचा खर्च त्यांना येतो. दर दिवशी दिड ते दोन हजार रुपयांची फुले विक्री करुन यातून संभाजी मैठे 45 हजार रुपयांचे उत्पादन घेतात.
‘आज फुललेले गुलाब, निशिगंध पाहून सर्वांना हेवा वाटतो. असे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु रोज गुलाब काढता – काढता खूप सारे काटेही हाताच्या वाट्याला घ्यावे लागतात. हिवाळ्यात पहाटे उठून फुलांची तोडणी करणे तेवढे सोपं नाही. आमचे सर्व घर या कामात असल्याने एक प्रकारे आम्हाला आमच्या जीवनातही गुलाब फुलविता आले’ अशी प्रांजळ कबुली संभाजी मैठे देतात.
या फुलांवरच एक मुलगी फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाला आहे तर मुले नांदेडला शिक्षण घेत असल्याचे अभिमानाने सुरेखा मैठे सांगतात. शेतासह संसारातही फुललेल्या फुलांची गोष्ट आणि मुलांच्या शिक्षणातील प्रगतीची गोष्ट सांगताना या दांपत्यांच्या पापण्याच्या कडा ओल्यावल्या नसतील तर नवलच.
(लेखक नांदेड येथे जिल्हा माहिती अधिकारी आहेत.)