चांदापुर येथे आठव्या बौद्ध धम्म परिषदेचा शानदार समारोप
भारताला सुख – समृध्दी मिळवून देण्यासाठी बुद्धांच्या सम्यक मार्गाचा अवलंब करा – स्वागताध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर
अंबाजोगाई : परळी तालुक्यातील मौजे चांदापुर येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार, दिनांक 13 फेब्रुवारी 2022 रोजी आठव्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या धम्म परिषदेला पुज्य भदन्त उपगुप्त महाथेरो (पुर्णा), पुज्य भिक्खू महाविरो (काळेगाव, अहमदपूर), पुज्य भिक्खू पय्यानंद (लातूर), पुज्य भिक्खू धम्मशील (हिंगोली/बीड) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त स्मृतीशेष शंकरराव जगतकर नगरी, चांदापुर (परळी) येथे ही धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. कोविड पार्श्वभूमीवर या धम्म परिषदेेचे ‘सम्यक संकल्प’ या पेजवरून फेसबुक लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यात आले.
आठव्या धम्म परिषदेची सुरूवात पंचरंगी धम्म ध्वजारोहणाने झाली. स्वागताध्यक्षपदी इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे होते तर या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनीचे अध्यक्ष ॲड. अनंतराव जगतकर तर यावेळी प्रदीप रोडे (बीड), चंद्रशेखर वडमारे, डॉ. विनोद जगतकर विजय हजारे यांची उपस्थिती होती. संयोजन समितीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन आदेशानुसार सर्व निर्देशांचे पालन केले.
या प्रसंगी बोलताना पुज्य भदंत उपगुप्त महाथेरो यांनी धम्म चांगला आहे, तो सर्वांनी स्विकारला पाहीजे, कारण धम्म हा विज्ञाननिष्ठ आहे. जगाच्या कल्याणाचा विचार यात सामावला आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे बुद्धी होती, नैतिकता होती. समाजाला सुखी करण्यासाठी ते एकाच वेळेस इंग्रज आणि तत्कालीन भारतीय नेत्यांशी लढले. त्यांनी या देशाची घडी बसवली. बौध्द धम्माचे तत्वज्ञान दिले. त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग आणि दहा पारमिता यावर मार्गदर्शन केले. आपण ज्ञानसंपन्न, शीलवान आणि नितीमान झाल्यावर यशस्वी होवू शकतो. माणसाला दु:खमुक्त करण्याची शिकवण आणि ताकद बौध्द धम्मात आहे. धम्म उपासकांनी धम्माचे आचरण करून दानाची भावनिकता वाढवावी. धम्म विचाराने परिवर्तन शक्य आहे. यापुढे धम्माचा विचार विस्तीर्ण करण्यासाठी कार्यरत राहू, उत्तम व चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे यावेळी उपगुप्त महाथेरो म्हणाले.
यावेळी बोलताना भिक्खू पय्यानंद यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला तथागतांचा शुध्द धम्म दिला. भारतीय संविधानात मानवी कल्याणाचा जो विचार सामावला आहे. तो वंदनीय बाबासाहेबांनी त्रिपीटीकातून घेतला आहे. आपल्याला कायद्याने सुरक्षित केले आहे. या देशाची मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येकाने धम्माचे आचरण केले पाहिजे. धम्म विचारात मोठी ऊर्जा सामावली आहे. धम्म म्हणजे काया, वाचा शुध्द करणे होय. दु:ख नष्ट करणे, शील घडविणे, जसे आपले कर्म तसे आपण घडतो. त्यामुळे आपणच आपल्या सुख, दुःखाला जबाबदार आहोत. आपण कोणत्याही जिवाची हत्या करायची नाही तर त्रिशरण, पंचशील आणि धम्माचे पालन केले तर माणूस सुखी होतो, असे भिक्खू पय्यानंद यांनी सांगितले.
भन्ते धम्मशील यांनी बोलताना सांगितले की, तथागत गौतम बुद्धांनी जगाला लोककल्याणाचा मार्ग सांगितला आहे. बुध्दाचा धम्म हा मनुष्याच्या कल्याणासाठी आहे. धम्मात दान पारमिता आहे. माणसाला माणूस बनविण्यासाठी प्रत्येकाने धम्माचे आचरण करावे, असे आवाहन भन्ते धम्मशील यांनी केले. यावेळी बोलताना भिक्खू महाविरो यांनी सांगितले की, धम्म हा समुद्रासारखा विशाल आहे. योग्य जीवनदृष्टी येण्यासाठी धम्म आचरण गरजेचे आहे. माणसाला दु:खातून मुक्त करण्याची शिकवण व मार्ग धम्मात सामावला आहे. धम्म हा सर्व मानवजातीसाठी असल्याचे यावेळी, भिक्खू महाविरो यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना राजेंद्र घोडके यांनी चांदापुर येथील तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाणच्या कार्याची माहिती यावेळी उपस्थितांसमोर ठेवली. चंद्रकांत इंगळे यांच्या योगदानाचे कौतुक केले. आज तक्षशिला बौद्ध धम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण नावारूपास येत असल्याचे सांगुन धम्म परिषदेसाठी नियमीत धम्मदान करावे, असे आवाहन केले.
स्वागताध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे देशाचे महत्त्वपूर्ण ग्रंथ असल्याचे सांगुन भारताला पुन्हा समृध्दी, सौख्य मिळवून द्यायचे असेल तर जीवन बुद्धांच्या सम्यक मार्गाने जगले पाहीजे, देशात बुध्द विचारांचे राज्य आणायचे असेल तर पुन्हा पुन्हा मनुस्मृतीचे दहन करावे लागेल. चांदापुर येथे नवे ऊर्जा केेंद्र निर्माण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना ॲड. अनंतराव जगतकर यांनी बुद्ध धम्माची महती विषद केली. चारित्र्यसंपन्न व नितीमान समाज निर्माण करण्यााठी धम्म आचरण करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ॲड. जगतकर यांनी यावेळेस केले. याप्रसंगी प्रदीप रोडे यांनी विचार मांडले. धम्म परिषदेच्या ठिकाणी परळी ग्रामीण पोलीस यांचे सुरक्षा पथक उपलब्ध करून देण्यात आले होते. या धम्म परिषदेत विविध महत्वपुर्ण ठराव मांडण्यात येवून ते पारित करण्यात आले. हे ठराव केंद्र व राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. ठरावांचे वाचन प्रा. गौतम गायकवाड यांनी केले तर धम्म परिषदेचे सुत्रसंचालन प्रा. मकरंद जोगदंड यांनी करून उपस्थित उपासक, उपासिका यांचे आभार जगन सरवदे यांनी मानले.
धम्म परिषदेच्या यशस्वितेसाठी तक्षशिला बौद्धधम्म प्रशिक्षण प्रतिष्ठाण जेतवन (ता. परळी जि. बीड) चे पदाधिकारी चंद्रकांत इंगळे, प्रा. प्रदिप रोडे, राजेंद्र घोडके, प्रा. गौतम गायकवाड, राहुल घोडके, जगन सरवदे, विश्वनाथ भालेराव, सिमा चंद्रकांत इंगळे आणि संयोजन समितीचे बौद्धाचार्य मुरलीधर कांबळे, माणिक रोडे, मिलींद नरबागे, राज जगतकर, प्रा. बी. एस. बनसोडे, किशोर इंगळे, चंद्रकांत बनसोडे, प्रा. मधुकर शिनगारे, वसंत वाघमारे, संजय साळवे (पुस), सुरेखा रोडे, अर्जुन काळे, आकाश वेडे, विनोद रोडे, धनंजय जोगदंड, सुशिल इंगळे, शिलाताई जोगदंड, रूक्मीण गोरे, सुभाष वाघमारे, बुद्धकरण जोगदंड, संजय सिंगणकर आदींनी पुढाकार घेतला. प्रसिध्दी प्रमुख म्हणुन प्रा. बालाजी जगतकर यांनी काम पाहिले.