निवारा हक्क समिती : अंबाजोगाईत हजारोंच्या संख्येने बेघर रस्त्यावर

बेघर, कष्टकर्‍यांना हक्काचे घर द्या – कॉ. बब्रुवाहन पोटभरे

अंबाजोगाई : प्रधानमंत्री आवास योजनेसह आदी आवास योजना अंबाजोगाई शहरात न राबविल्याच्या निषेधार्थ निवारा हक्क समितीच्या वतीने सोमवार, दि.14 फेब्रुवारीला शहरात ‘मुक आंदोलन’ रॅली काढण्यात आली. या रॅलीने अंबाजोगाईकरांचे लक्ष वेधले. हक्काचे घर द्या, या मागणीसाठी शहरातील सामाजिक सर्वहारा, बेघर, कष्टकरी वर्ग हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आला. या मुक आंदोलनात स्त्रीयांचा लक्षणीय सहभाग होता. या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी केले. या प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी विहित नमुन्यात घरकुल मिळणेबाबतच्या मागणीचे तब्बल 1360 फॉर्म उपजिल्हाधिकार्‍यांना सदरील निवेदनासोबत दिले.

‘मुक आंदोलन’ ची सुरूवात पोलिस ठाण्यासमोरून करण्यात आली. आंदोलनकर्ते बेघरांना घरकुले द्या, निवारा आमचा अधिकार यासह निवारा हक्क समितीच्या घोषणांचे फलक घेवून पोलिस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघुन उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आले.

या प्रसंगी कॉ. बब्रुवाहन पोटभरे यांनी उपस्थित आंदोलन कर्त्यांना संबोधित केले तर निवारा हक्क समितीचे सहनिमंत्रक विनोद शिंदे, ज्योती सोळंके, भिमशाहीर गौतम सरवदे यांनीही आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले.

निवारा हक्क समितीने देशाचे पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, भारत सरकारने व राज्य सरकार यांनी बेघर, भूमिहीन व मजुरी करणार्‍या जनतेसाठी आवास योजना राबविण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेतला असताना आमच्या जिल्ह्यात बीड, परळी, गेवराई, माजलगाव या ठिकाणच्या तुलनेत अंबाजोगाई शहरात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्या संगणमताने जाणिवपुर्वक या योजना राबविल्या गेल्या नाहीत. याचा जाब केंद्र सरकारने विचारणे आवश्यक आहे. या शहरामध्ये दलित, मुस्लिम, मागास व अतिमागास श्रमिक जनतेची प्रचंड लोकसंख्या असून ते विविध झोपडपट्यांमध्ये राहतात. ज्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधांचा अभाव आहे. या ‘मुक आंदोलन’ द्वारे आम्ही मागणी करतो की, या शहरात जिथे जिथे बेघर, भूमिहीन मजुर, मागास व आती मागास गरीब माणूस राहतो, त्याला निवारा मिळणे आवश्यक आहे. येत्या दोन महिन्यात भारत सरकारने यावर परिणामकारक पाऊले उचलून राज्य सरकार आणि इथल्या नगरपरिषदेला जागरूक करून प्रधानमंत्री आवास योजना आणि आदी आवास योजना पदरात पाडून द्याव्यात, नसता आम्ही आचारसंहितेच्या काळातही या शहरात सातत्याने आंदोलने करीत राहू, असा इशारा सदरील निवेदनाद्वारे दिला आहे.

या निवेदनावर निवारा हक्क समितीचे निमंत्रक कॉ. बब्रुवाहन पोटभरे, सहनिमंत्रक विनोद शिंदे, भागवत जाधव, कलिमा, ज्योती सोळंके, रोहिणी काळम, शेख नुर, रवि आवाडे, धिरज वाघमारे, वंदना प्रधान, अविनाश कुराडे, प्रज्ञा गायकवाड आदींसह इतरांच्या स्वाक्षर्‍या आहेत.