वाचन, चिंतन सतत केल्याने विषयाची पकड निर्माण होते – डॉ. सुरेश खुरसाळे

अंबाजोगाई : वाचन, मनन आणि चिंतन सतत केल्याने विषयाची पकड निर्माण होते, असे प्रतिपादन डॉ. सुरेश खुरसाळे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता परीक्षा अर्थात सेट – नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून डॉ. सुरेश खुरसाळे बोलत होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. खुरसाळे म्हणाले की, सेट – नेट आणि युपीएससी, एमपीएससी परीक्षेत यश मिळविण्यासाठी केवळ जवळ पदवी असून चालत नाही तर आपल्या विषयाचा सखोल अभ्यास, अभ्यासक्रमावर आधारित प्रमाणित संदर्भ ग्रंथांचे वाचन आणि वाचनासोबत सतत मनन व चिंतन आवश्यक आहे. 

रट्टा मारणे, घोकंपट्टी करणे वेगळे.. पण विषयाचे सखोल आकलन होण्यासाठी सतत वाचन, मनन, चिंतन आवश्यक आहे. काही अंतराने आपण आपला विषय पुन्हा समजपूर्वक वाचला पाहिजे. त्यावर जाणकार मंडळींशी चर्चा केली पाहिजे, असे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे चार विद्यार्थी तुकाराम वाघ, साधना मडके, व्यंकटेश विभुते, गिरीश पुजारी आणि इंग्रजी विभागाचे अशोक ताटे, राहुल पवार, संभाजी मंत्रे हे तीन विद्यार्थी, अर्थशास्त्राचे महेश कुपरवाड आणि वाणिज्य विभागाची तृप्ती पाडेकर आदी विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालय आणि अंतर्गत गुणवत्ता हमी मंडळ यांच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला. 

यावेळी प्रा. नानासाहेब गाठाळ, संस्थेचे कार्य. उपाध्यक्ष कमलाकर चौसाळकर, प्रा. डॉ. साहेबराव गाठाळ, प्रा. माणिकराव लोमटे, प्रा. एन. के. गोलेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. साहेबराव गाठाळ यांनी यावेळी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सत्काराला उत्तर देताना महाविद्यालयात उपलब्ध सुविधा, मार्गदर्शन, ग्रंथालय आणि प्राध्यापक व संस्थेचे सतत पाठबळ यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो, अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. आर. थारकर यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. रमेश सोनवलकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. धनाजी आर्य यांनी केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. प्रवीण भोसले, आदर्श शिक्षक किर्दंत, डॉ. संपदा कुलकर्णी, प्रा. डॉ. रुद्देवाड, प्रा. डॉ. अब्दुल रौफ, प्रा. ममता राठी, प्रा. अभिजित देशपांडे, तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक आणि पदव्युत्तर वर्गाचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. मुंडे बी.डी., प्रा. झोडगे रामेश्वर, प्रा. सागर कुलकर्णी, प्रा. डॉ. गंगाधर आकलोड, प्रा. डॉ. भाबरडोडे, वाहेद, समशुद्दिन, शिवाजी सांमसे यांनी पुढाकार घेतला.