जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा : 51 लाखांचा मुद्देमाल जप्त

अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने केली कारवाई ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधात पोलिसांनी कडक पावलं उचलली असून मंगळवारी (दि.25) सायंकाळी सातच्या सुमारास पोलीसांनी तालुक्‍यातील साकुड येथे एका शेतात पत्र्याच्या शेडमध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 51 लाख 17 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन 12 जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने केली. 

या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्‍यातील साकुड शिवारातील दत्ता मानाजी शेप (रा. शेपवाडी) यांच्या शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये काही लोक तिर्रट नावाचा जुगार खेळतात, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी लागलीच सापळा रचून घटनास्थळी जाऊन आरोपींना जुगार खेळतांना रंगेहाथ पकडले. तसेच यावेळी त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि चारचाकी गाड्या असा 51 लाख 17 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी पोलीस नाईक तानाजी तागड यांच्या फिर्यादीवरुन बारा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चौधर, पो. ना. तानाजी तागड, बीट अंमलदार मोरे, शुभम राऊत, नाना राऊत, शिनगारे, रामेश्वर सुरवसे, पठाण, देवकते यांनी केली असुन या घटनेचा अधिक तपास मोरे हे करित आहेत.