अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा शब्द पालकमंत्र्यांनी दिला होता. एक वर्ष पूर्ण झाले तरी पालकमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यासाठी पँथर सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रम समितीच्या वतीने आज दिनांक 26 जानेवारीला येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंबाजोगाई उपविभागीय कार्यालयासमोर अंबाजोगाई येथील आंबेडकरी कार्यकर्ते धरणे आंदोलन करित आहोत. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक तात्काळ करण्याचा दिलेला शब्द एक वर्षे होऊनही पाळला नाही. तसेच राज्य सरकार आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यां विरोधात एमपीडीए तथा सत्तेचा गैरवापर करून आंबेडकरी चळवळीबद्दल असणारा द्वेष, आकस जाहीर करित आहे, म्हणून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात कॉ. बब्रुवाहन पोटभरे, ॲड. विलास लोखंडे, जेष्ठ सामाजिक नेते बन्सी आण्णा जोगदंड, शैलेश कांबळे, गोविंद मस्के, परमेश्वर जोगदंड, धीरज वाघमारे, किशोर वाघमारे, सतीश सोनवणे, सचिन वाघमारे, धर्मराज चौरे, सिद्राम माने, शरद ढगे, देवकुमार करडे, पांचाळ सिद्धार्थ, शुभम क्षीरसागर, भागवत जाधव, प्रवीण मिसाळ यासह आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.