टीम AM : विनोदाचा बादशहा मेहमूद यांचा जन्मदिन. मेहमूद यांचा जन्म 29 सप्टेंबर 1932 साली झाला. मुमताज अली, हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत. मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला.
विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला ‘दो बिघा जमीन’ व ‘प्यासा’ या चित्रपटात छोटी – मोठी कामे केली. पहिला ब्रेक ‘परवरिश’ या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले.
नंतर मेहमूद यांनी त्यांच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस चालू केले. प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस – कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठच्या दशकतील हिट चित्रपट पडोसन. पडोसनला आज ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते. मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हिरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी मेहमूद हिरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते.
‘सुंदर’ सिनेमात मेहमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हिरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर मेहमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच ‘हमजोली’ सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु मेहमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते. हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र, त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्याससुध्दा भाग पाडले.
‘कुंवारा बाप’, ‘लाखो में एक जैसा’ सारखे सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये मेहमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. ‘कुंवारा बाप’ हा मेहमूद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. मेहमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले, मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला होता. आय. एस. जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर मेहमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधून काम केले. मेहमूद यांचे 23 जुलै 2004 रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर