टीम AM : आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, दलित पँथरचे एक संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक आणि लेखक राजा ढाले यांचा आज स्मृतिदिन. राजा ढाले यांचा जन्म. 30 सप्टेंबर 1940. राजा ढाले यांचे पूर्ण नाव राजाराम पिराजी ढाले होते. आंबेडकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते, बौद्ध साहित्याचे गाढे अभ्यासक, बंडखोर लेखक आणि कवी, लढाऊ कार्यकर्ते आणि चळवळीचे मार्गदर्शक अशी त्यांची ओळख होती. राज्यात ठिकठिकाणी दलितांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे अस्वस्थ झालेल्या तरुणांनी अमेरिकी कृष्णवर्णीय ‘ब्लॅक पँथर’ संघटनेच्या धर्तीवर ‘दलित पँथर’ ही लढाऊ सामाजिक संघटना स्थापन केली.
कालांतराने ‘दलित पँथर’ बरखास्त झाली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर 1999 मध्ये राजा ढाले यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. 2004 साली त्यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. पण ते निवडून आले नव्हते.
महात्मा फुले यांची बदनामी करणारा एका वृत्तपत्रातील लेख, ‘रिडल्स इन हिंदुझम’ ग्रंथावरील वादादरम्यान ढाले यांनी आक्रमक भाषेत मांडणी केल्यामुळे ते आंबेडकरी जनतेत विशेष प्रसिद्ध झाले. तापसी, येरु, चक्रवर्ती, जातक, विद्रोह अशा अनियतकालिकांत ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन आणि विविध नियतकालिकांचे संपादन असे विपुल लिखाण त्यांनी केले आहे.
‘प्रबुद्ध भारत’ मध्ये त्यांनी सुरुवातीला लिखाण केले. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, वसंत गुर्जर, ज. वि. पवार, सतीश काळसेकर यांच्यासह राजा ढाले यांनी ‘लिटल मॅगेझिन’ ची चळवळ सुरू केली. मास मूव्हमेंट, सम्यक क्रांती संघटना आदींचे ते संस्थापक सदस्य होते. ढाले यांनी सत्यकथेमधून लिखाण केले. भारतीय स्वातंत्र्याला प्रश्न करणारा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा त्यांचा लेख गाजला होता. तापसी, येरू, चक्रवर्ती, जातक, विद्रोह आदी लघुअनियतकांमध्ये राजा ढाले यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच त्यांच्या कविता, कथा, प्रस्तावना, प्रसंगोपात लेख, संशोधनात्मक लेखन ठिकठिकाणी प्रसिद्ध झाले आहे. राजा ढाले यांचे 16 जुलै 2019 रोजी निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.
शब्दांकन : संजीव वेलणकर