मेरी आवाज ही पहचान है…पार्श्वगायनाच्या कारकिर्दीने व्यापली सात‌ दशकं

भारतरत्न, स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज स्मृतिदिन. लता मंगेशकर यांचा जन्म. 28 सप्टेंबर 1929 ला झाला. लता मंगेशकर, भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान. लतादीदींच्या स्वर्गीय स्वरांना कळीकाळाची, प्रांतांची, देशांच्या सीमांची मर्यादा नाही. या स्वरांना कोंदण आहे ते केवळ उत्कटतेचे, भव्यतेचेे !

लता मंगेशकर भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मग हा भारतीय आपल्याच मायदेशात राहत असो वा विदेशात स्थायिक झालेला असो. जगाच्या पाठीवर जिथे जिथे भारतीय माणूस वसलेला आहे, तिथे तिथे तो लता मंगेशकर यांचा स्वर सोबत घेऊन गेला आहे.

लतादीदींच्या आयुष्यातील सात दशके ही त्यांच्या पार्श्वगायनाच्या कारकिर्दीने व्यापलेली आहेत. सलग सहा दशकांपेक्षा जास्त काळ गात राहणं हाच एक चमत्कार आहे. तो लता मंगेशकर यांनी केला आहे. काळ बदलला, श्रोत्यांच्या तर कित्येक पिढ्या बदलल्या, आता यू ट्यूब आणि मोबाईल ‘ॲप्स’ च्या युगातल्या तरुणांवरही त्यांच्या आवाजाचं गारुड कायम आहे. कारण त्यांचा स्वर कालातीत आहे.

आजच्या पीढीला `कृष्ण धवल’ म्हणजेच `ब्लॅक ऍण्ड व्हाईट’ चित्रपट कसा असतो हे जवळपास माहितही नाही. मग त्या काळातल्या कलावंतांविषयी- अभिनेते, अभिनेत्री, संगीतकारांबद्दल त्यांना काही माहिती असण्याचं कारणचं नाही. तरी त्यांना एक नाव नीट ठाऊक असत. ते म्हणजे लता मंगेशकर. भारतीय चित्रपट 1932 मध्ये बोलू लागला आणि लगेचच गाऊही लागला. बोलपटांच्या प्रारंभीच्या काळात अभिनेत्यांना स्वतःची गाणी स्वतःच म्हणावी लागत. बोलपट स्थिरावून जेमतेम 15 वर्षं होत होती. त्या सुमारास चित्रपटसृष्टीत एका चमत्काराचा उदय झाला. लता मंगेशकर हे त्या चमत्काराचं नाव.

अभिनेत्री, संगीतकार यांच्या पिढ्या बदलल्या, पण लता मंगेशकर हे नाव ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ आहे. अर्थात हे यश सहज साध्य नव्हतं. लतादीदींनी त्यासाठी अपरंपार कष्ट घेतले. पोरवयात पडलेली कुटुंबाची जबाबदारी सांभाळत लतादीदींनी स्वरांचं एक अफाट विश्व उभं केलं आहे. हिंदी – उर्दू शब्दांचे उच्चार असोत किंवा लाहोर घराण्याची, पंजाबी – पतियाळा शैली असो, ठुमरीची बनारस शैली असो, बंगालमधून आलेली बाऊल शैली असो, आधीच्या सर्व गायिका बघता बघता विस्मरणात जातील असे गायकीचे रंग लतादीदींनी रसिकांसमोर पेश केले.

अनिल विश्वास यांच्याकडून मायक्रोफोन समोर गाताना श्वास कसा सांभाळावा हे त्या शिकल्या. तसंच श्यामसुंदर, नौशाद यांच्यापासून प्रत्येक संगीतकाराकडून काही शिकण्यासारखं असतं, असं समजून त्या शिकत गेल्या आणि आपल्यात सुधारणा करत गेल्या. हे जसं खरं आहे तसंच तीन सप्तकांची मर्यादा न जुमानणारा त्यांचा सुरेल आवाज प्रत्येक संगीतकाराच्या प्रतिभेसमोर नवे सृजनात्मक आव्हान उभे करत होता, हेही खरं आहे. या आवाजाला नादसृष्टीतील काहीही अशक्य नाही हे लक्षात आल्यानं संगीतकारदेखील लतादीदींसाठी अवघड स्वररचना बांधीत गेले आणि दीदींनी ते सारे स्वराकार अधिक सुंदर करून मांडले. 

काळ बदलला, संगीतकार बदलले, श्रोत्यांच्या पिढ्या बदलल्या, त्यांची आवड बदलली तरी लतादिदी गातच राहिल्या, त्यांची गाणी सर्वांना आवडतच राहिली. ते का? स्वतः लतादिदी देखील या काळात बदलत राहिल्या. अनिल विश्वास, सी.रामचंद्र, सज्जाद, सचिन देव बर्मनपासून शंकर – जयकिशन, लक्ष्मीकांत – प्यारेलाल, बप्पी लाहिरी, आर.डी.बर्मन ते ए. आर. रेहमानपर्यंत असंख्य संगीतकारांची शैली वेगळी, रंग वेगळा. त्यात समान सूत्र – लता मंगेशकर हेच. त्यांच्या असीम क्षमतेमुळेच प्रत्येक निर्मात्याला, संगीत दिग्दर्शकाला आपल्या चित्रपटात लताचं गाणं असणं आवश्यक वाटत होतं. त्यामुळे एके काळच्या प्रस्थापित गायिका मागे पडल्या.

पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली चित्रपटातली गाणी, भावगीतं किंवा मीराबाईची भजनं व त्यांच्या स्वररचनांना दिदींनी दिलेलं स्वररूप ऐकताना श्रोता थक्क होतो. त्यांच्या गळय़ात गंधार आहे, असे वर्णन करणं सोपं आहे, पण तो स्वर जपण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रचंड रियाझाची फार थोड्यांना कल्पना असेल. चित्रपट संगीत हे मुख्यतः शब्दप्रधान संगीत आहे, चित्रपटातली गीतं त्या चित्रपटाच्या कथेविषयी, पात्रांविषयी, पात्रांच्या मनोवस्थेविषयी काही सांगत असतात, हे लतादीदींनी फार लवकर जाणलं. 

आधीचे गायक अभिनेते – अभिनेत्री पडद्यावर देखील दिसत असत. पार्श्वगायनाच्या बाबतीत पडद्यावर दिसणारे आणि गाणारे वेगवेगळे असतात. पडद्यावर दिसणारा प्रसंग, ते गाणं सादर करणारी अभिनेत्री केवळ यांचाच नव्हे, तर त्या अभिनेत्रीच्या बोलण्याच्या, उच्चाराच्या लकबींचा अभ्यास करून लतादीदी गात राहिल्या.

लता मंगेशकर यांना गायन क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आतापर्यंत ‘परिचय’, ‘कोरा कागज’, ‘लेकिन’ या तीन चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे. यासोबत भारत सरकारने त्यांना 1969 साली पद्मभूषण, 1989 साली दादासाहेब फाळके पुरस्कार, 1999 साली पद्मविभूषण, 2001 साली ‘भारतरत्न’ च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत सरकारने गेल्या वर्षी लता मंगेशकर यांना ‘डॉटर ऑफ द नेशन’ हा पुरस्कार दिला होता. लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबईत निधन झालं, त्यांना अभिवादन.

शब्दांकन : संजीव वेलणकर