टीम AM : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी बिरुदावली असणारे निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. 27 सप्टेंबर 1932 पंजाबमधील जालंधर येथे झाला. बी. आर. चोप्रा आणि यश चोप्रा हे सख्खे भाऊ. सहायक दिग्दर्शक म्हणून यश चोप्रा यांनी आपल्या करिअरला बी. आर. चोप्रा यांच्याकडे सुरवात केली. ‘नास्तिक’ या आय. एस. जोहर यांच्या चित्रपटात निर्माता – निर्देशक यश चोपडा हे जोहर यांचे असिस्टेंट डायरेक्टर होते. 1559 मध्ये ‘धूल का फूल‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
राजेंद्र कुमार व माला सिन्हा या कलाकारांना घेऊन त्यांनी हा चित्रपट बनविला. त्यानंतर ‘आदमी और इन्सान‘, ‘धरतीपुत्र‘, ‘वक्त‘ असे काही चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. 1965 मध्ये त्यांचा ‘वक्त’ चित्रपट आला. बॉलीवूडमधील हा पहिला मल्टीस्टार चित्रपट होय. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांना घेऊन बनविलेल्या ‘दाग‘ या चित्रपटाद्वारे त्यांनी निर्मितीत पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. 1973 मध्ये त्यांनी यशराज चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. ‘काला पत्थर’, ‘चांदनी‘, ‘लम्हे‘, ‘दिल तो पागल है‘, ‘वीर झारा‘, ‘सिलसिला‘, ‘डर‘, ‘रब ने बना दी जोडी‘ अशा अनेक चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. तसेच ‘दीवार‘, ‘त्रिशूल‘ अशा काही अन्य निर्मात्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. चोप्रा यांनी एकूण 53 सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. त्यांनी धूल का फुल, धर्मपुत्र, वक्त, इत्तेफाक आणि आदमी और इन्सान हे पाच सलग यशस्वी चित्रपट दिले.
यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही यश चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही. आपल्या सिनेमातून अनेकांना स्टारडम मिळवून दिले. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, याचे श्रेय निश्चितपणे यश चोप्रा यांना जाते. त्यांच्याबरोबर अनेक कलाकारांनी काम केले असले तरी अमिताभ बच्चन हे त्यांचे आवडते कलाकार होते. ‘सिलसिला’ साठी त्यांनी अमिताभ बच्चन, जया भादुरी व रेखा यांना एकत्र आणले. त्या वेळी हिंदी चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली होती. विविध आणि आकर्षक लोकेशन्स व सुमधुर गाणी ही त्यांच्या चित्रपटांची खासियत होती. असे म्हणतात यश चोप्रा बॉलिवूडची अभिनेत्री मुमताजच्या प्रेमात अक्षरश: वेडे होते. मुमताज यश चोप्रांच्या प्रेमात होती, तसेच यश चोप्रा हेही मुमताजच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.
इतके की, ‘आदमी और इंसान’ या चित्रपटात कॅमेराचा संपूर्ण फोकस मुमताजवर राहावा, यासाठी त्यांनी प्रचंड खटाटोप केला होता. असे म्हणतात की, दोघेही लग्न करणार होते. कारण त्यावेळी दोघेही सिंगल होते. दोघांचे प्रेम पाहून यश चोप्रांचे मोठे बंधू बी. आर. चोप्रा मुमताजच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले. पण मुमताजच्या कुटुंबाने या लग्नाला नकार दिला. करिअर सोडून मुमताजने घर सांभाळावे, यास तिच्या घरच्यांचा विरोध होता. मग काय, याचसोबत यश व मुमताज यांचे नाते संपुष्टात आले.
यानंतर यश यांनी पामेला सिंगसोबत लग्न केले आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले. त्यांना दोन मुले असून आदित्य आणि उदय ही त्यांची नावे आहेत. त्यांचा थोरला मुलगा आदित्य दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याचे अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न झाले तर छोटा मुलगा उदय चोप्रा बॉलिवूड अभिनेता आहे. दादासाहेब फाळके पुरस्कारासह पद्मभूषण, तसेच अन्य काही पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. यश चोप्रा यांनी पाच दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले. यादम्यान त्यांना 6 राष्ट्रीय व 11 फिल्मफेअर पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. चित्रपट सृष्टीतील अतुल्य योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यश चोप्रा यांचे 21 ऑक्टोबर 2012 रोजी निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.
शब्दांकन : संजीव वेलणकर