चॉकलेट हिरो, सिनेअभिनेते देव आनंद यांचा समृतीदिन : फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने रसिकांच्या हृदयात मिळवले स्थान

टीम AM : सदाबहार, चिरतरुण, चॉकलेट हिरो असे ज्यांचे वर्णन केले जाते ते ज्येष्ठ सिनेअभिनेते देव आनंद यांचा आज स्मृतीदिन. देव आनंद यांचा जन्म. 26 सप्टेंबर 1923 साली झाला. देव आनंद यांचे मूळ नाव देवदत्त पिशोरीमल आनंद असे होते.

बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. लाहोरच्या प्रसिद्ध सरकारी कॉलेजमध्ये 1942 मध्ये त्यांनी इंग्रजी साहित्यात ग्रॅज्युएशन केले. याच कॉलेजमध्ये त्यांची ओळख बलराज साहनी, बी. आर. चोपडा, आणि खुशवंत सिंह या भविष्यात खूप मोठ्या झालेल्या व्यक्तींशी झाली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लष्कराच्या सेन्सॉर ऑफिसमध्ये कारकून पदावर नोकरी सुरू केली. सैनिक आणि त्यांचे नातलग यांच्यातील पत्रव्यवहार तपासणे आणि पत्र योग्य पत्त्यावर लवकर पोहोचवण्याची व्यवस्था करणे हे त्यांचे काम होते.

अल्पावधीतच नोकरी सोडून त्यांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. प्रभात कंपनीच्या ‘हम एक है’ मधून चित्रपट सृष्टीतली कारकिर्द सुरू करणाऱ्या देव आनंद यांना आधी मोठे अपयश पचवावे लागले. ‘हम एक है’ आपटला. पुढे देव आनंद यांच्याच नवकेतन कंपनीचा ‘अफसर’ हा चित्रपट देखील पडला. पण या अपयशाने न डगमगता चित्रपट सृष्टीत पाय रोवून उभ्या राहिलेल्या देव आनंद यांचा ‘बाजी’ हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्यानंतर उत्तरोत्तर देव आनंद यांनी अनेक छान चित्रपट दिले.

हम एक है, अफसर, बाजी, मुनीम जी, दुश्मन, कालाबाजार, सी. आय. डी., पेइंग गेस्ट, गॅम्बलर, तेरे घर के सामने, काला पानी, जाल, गाइड, तेरे मेरे सपने, छुपा रुस्तम, हरे रामा हरे कृष्णा, हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर, हम दोनो आणि ज्वेलथीफ हे देव आनंद यांचे निवडक चित्रपट कायमच चर्चेचा विषय राहिले. देव आनंद यांची ‘हम एक है’ चित्रपटाचे काम सुरू असतानाच गुरुदत्त यांच्याशी एक कॅमेरामन म्हणून ओळख झाली होती. पुढे ज्येष्ठ बंधू चेतन आनंद यांनी दिग्दर्शित केलेला ‘अफसर’ चित्रपट पडल्यावर देव आनंद यांनी गुरुदत्त यांनाच दिग्दर्शकाच्या भूमिकेत आणले. 

नवकेतन कंपनीसाठी गुरुदत्त यांनी बाजी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. हा सिनेमा हिट झाला. त्यानंतर गुरुदत्त यांनीच देव आनंदसाठी ‘जाल’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. ‘जाल’ चित्रपटानंतर मात्र गुरुदत्त यांनी फक्त स्वतःच्या कंपनीसाठी काम करण्याचा निर्णय घेतला आणि देव आनंद यांच्या नवकेतन कंपनीच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विजय आनंद यांच्याकडे आली. देव आनंद यांचे धाकटे बंधू विजय आनंद यांनी काला बाजार, तेरे घर के सामने, छुपा रुस्तम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याच काळात देव आनंद आणि सुरय्या विवाहाची चर्चा सुरू झाली.

चित्रपट सृष्टीत वावरणाऱ्या देव आनंद यांनी अभिनय आणि चित्रपट निर्मिती सोबतच पटकथा लेखन करण्याचाही प्रयोग केला. आंधिया, हरे रामा हरे कृष्णा, हम नौजवान, अव्वल नंबर, प्यार का तराना, गँगस्टर, मै सोलह बरस का, सेन्सॉर या चित्रपटांसाठी देव आनंद यांनीच पटकथालेखन केले. हिरा पन्ना, देश परदेस, लूटमार, स्वामी दादा, सच्चे का बोलबाला, अव्वल नंबर अशा निवडक चित्रपटांचे दिग्दर्शनही केले. अफसरच्या निमित्ताने देव आनंद – सुरय्या जोडी पहिल्यांदा पडद्यावर एकत्र दिसली होती. तेव्हापासूनच देव आनंद सुरय्याच्या प्रेमात होते. पुढे एका शूटिंगच्या वेळी नाव उलटली, त्यावेळी देव आनंद यांनी बुडणाऱ्या सुरय्या यांना वाचवले होते. त्यामुळे आता लवकरच विवाह सोहळा होणार, असे वाटत होते. पण सुरय्या यांच्या आजीने तीव्र विरोध केल्यामुळे हे लग्न झाले नाही. अखेर देव आनंद 1954 मध्ये चित्रपट अभिनेत्री कल्पना कार्तिक हिच्याशी विवाहबद्ध झाले. 

देव आनंद यांनी अनेक नव्या अभिनेत्रींना चित्रपटसृष्टीत आणले. हरे रामा हरे कृष्णा मधून झीनत अमान चित्रपटसृष्टीत आली. टीना मुनीम, नताशा सिन्हा, एकता यांना देखील देव आनंद यांनी चित्रपटसृष्टीचे द्वार खुले करुन दिले. संगीतप्रधान हिंदी चित्रपटांतून रंगवलेल्या त्यांच्या अनेक भूमिका लोकप्रिय ठरल्या. केसांचा महिरपी तुरा, गुलछबू आणि देखणी चेहरेपट्टी यांमुळे उठून दिसणाऱ्या त्यांच्या फॅशनदार व्यक्तिमत्त्वाने चित्रपट रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील ग्रेगरी पेक या अभिनेत्याशी तुलना केली जाई. 

गीता बाली, वहिदा रेहमान, मधुबाला अशा अनेक नामवंत अभिनेत्रींसोबत त्यांनी अनेक चित्रपट केले. देव आनंद यांची अनेक गाणी गाजली. तू कहा ये बता, देखे रूठा ना करो, दिल का भवर करे पुकार, गाता रहे मेरा दिल, मै जिंदगी का साथ निभा था चला गया, दिन ढल जाये, छोड दो आंचल अशी अनेक गाणी प्रचंड गाजली. देव आनंद यांना काला पानी सिनेमासाठी बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर पुरस्कार 1950, गाइड सिनेमासाठी बेस्ट ॲक्टर फिल्मफेअर पुरस्कार 1965 साली मिळाला. देव आनंद यांना दादासाहेब फाळके पुरस्कार व पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. देव आनंद यांचे 3 डिसेंबर 2011 रोजी निधन झाले. देव आनंद यांना आदरांजली.

शब्दांकन : संजीव वेलणकर