ज्येष्ठ निर्माते ताराचंद बडजात्या यांचा स्मृतीदिन. ताराचंद बडजात्या यांचा जन्म. 10 मे 1914 साली झाला. ताराचंद बडजात्या यांना पारिवारिक व पारंपारिक चित्रपटाचे निर्माते म्हणून ओळखले जात. त्यांनी बॉलीवूडवर चाळीस वर्षे राज्य केले. ताराचंद बडजात्या यांना बॉलीवूडमध्ये सेठजी या नावाने ओळखले जायचे. ताराचंद बडजात्या यांचा जन्म राजस्थानमधील एका मध्यम वर्गीय परिवारात झाला.
ताराचंद बडजात्या यांनी आपले शिक्षण कोलकात्याच्या विद्यासागर कॉलेजमधून पूर्ण केले. त्यांच्या वडीलांना ताराचंद बॅरिस्टर व्हावेत असे वाटत होते. परंतु घरची आर्थिक स्थिति खराब असल्याने ते शक्य झाले नाही. 1933 मध्ये ताराचंद नोकरीसाठी मुंबईत आले. मुंबईत ते मोती महल थियेटर्स प्राइवेट लिमिटेड या फिल्म वितरण संस्थेत कामाला लागले. 1939 मध्ये त्यांच्या कामावर खुश होऊन त्या वितरण संस्थेने त्यांना महाप्रबंधकाचे पद दिले व मद्रासला बदली केली.
मद्रासला येऊन त्यांच्या अनेक निर्मात्यांच्या बरोबर ओळखी झाल्या. फिल्म वितरण संस्थेचा व्यवसाय वाढवण्यास मदत झाली. एक दिवस फिल्म वितरण संस्थेच्या मालकाने स्वत:ची वितरण संस्था सुरू करण्याचा सल्ला व आर्थिक सहायता करण्याचे आश्वासन दिले. या सर्वामुळे ताराचंद यांनी स्वत:ची वितरण संस्था सुरू करण्याचा निश्चय केला व 15 ऑगस्ट 1947 साली ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला, त्या दिवशी ‘राजश्री’ ही वितरण संस्था सुरवात केली. वितरण व्यवसायाचा पहिला चित्रपट होता चंद्रलेखा. जेमिनी स्टूडियोचा हा चित्रपट सुपरहिट झाला व ताराचंद यांना चांगला फायदा झाला. ते जेमिनी स्टूडियोचे वितरक झाले. या नंतर ताराचंद यांनी दक्षिण भारतातील इतर निर्मात्यांना हिन्दी चित्रपट बनवण्यास प्रेरित केले.
अंजली, व्हीनस, पक्षी राज व प्रसाद प्रोडक्शन अश्या फिल्म निर्माण संस्थानी त्यांच्या सहयोगाने हिन्दी फिल्म निर्माण करणे चालू केले. या नंतर ताराचंद यांनी फिल्म प्रदर्शनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. तेथे पण त्यांना यश आले व ताराचंद यांनी फिल्म प्रदर्शनाबरोबर अनेक शहरात सिनेमागृह बांधली आणि पारिवारिक चित्रपट बनवण्यास सुरवात केली.
1962 मध्ये आरती चित्रपटाद्वारे त्यांनी फिल्म निर्माणच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ताराचंद बडजात्या यांनी आपल्या चित्रपट निर्मितीत कायम नवीन कलाकारांना घेऊन काम केले. 1964 साली अभिनेता संजय खान यांना ब्रेक देऊन दोस्ती चित्रपटाची
निर्मिती केली. सचिन-सारिका यांना गीत गाता चल, अमोल पालेकर-जरीना वहाब यांना चितचोर, रंजीता यांना अंखियों के झंरोखो से, राखी यांना जीवन मृत्यु, अरुण गोविल यांना सावन को आने दो, रामेश्वरी यांना दुल्हन वही जो पिया मन भाए, सलमान खान-भाग्यश्री यांना मैने प्यार किया अशी कित्येक जणांना त्यांनी ब्रेक देऊन त्यांना बॉलीवुडमध्ये प्रवेश दिला. ताराचंद बडजात्या यांना दोन वेळा ‘फिल्मफेयर’ चा सर्वश्रेष्ठ फिल्मकार हा पुरस्कार मिळाला. ताराचंद बडजात्या यांचे 21 सप्टेंबर 1992 रोजी निधन झाले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर