गुड न्यूज : ‘स्वाराती’ ला 40 कोटींचा निधी : वर्ग – 3 निवासस्थान, मुलींचे वसतिगृह व ‘ओपीडी’ इमारतीच्या बांधकमाला मंजुरी

टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विविध विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. केंद्र शासनाच्या ‘राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य’ योजनेंतर्गत अंबाजोगाईच्या ‘स्वाराती’ साठी तब्बल 42 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 40 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने 4 सप्टेंबर 2026 रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. या निधीतून ‘स्वाराती’ परिसरात वर्ग – 3 कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी 25 कोटी रुपये, 160 मुलींच्या वसतिगृहाच्या दुसऱ्या मजल्यासाठी 5 कोटी रुपये, तर ‘ओपीडी’ इमारतीच्या उर्वरित बांधकामासाठी आणखी 10 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही काळापासून ‘स्वाराती’ मध्ये पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने चर्चा होत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळालेला हा निधी रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. या कामांना गती मिळाल्यास विद्यार्थ्यांसह रुग्ण, डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ‘स्वाराती’ च्या विकासासाठी मंजूर झालेला हा निधी प्रत्यक्षात किती वेगाने खर्च होतो आणि कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण होतात का ?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here