विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होण्याची शक्यता…!
टीम AM : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात ‘स्वाराती’ विविध समस्यांच्या विळख्यात सापडले असतानाच आता आणखी एक धक्का बसला आहे. ‘स्वाराती’ मधील सात डॉक्टरांची अहिल्यानगर येथे पुन्हा प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आधीच तज्ज्ञ डॉक्टर आणि प्राध्यापकांची कमतरता असलेल्या या वैद्यकीय महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्रावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रतिनियुक्ती झालेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. दिपाली कुलकर्णी, डॉ. दिपक कावळे, डॉ. राकेश जाधव, डाॅ. भाऊसाहेब मुंडे, डॉ. नागेश आब्दगिरे, डॉ. राहुल हाके पाटील, डॉ. अमोल कापसे यांचा समावेश आहे.
‘स्वाराती’ ला यंदा 50 वर्षे पूर्ण होत असताना संस्थेच्या विकासाला गती मिळण्याऐवजी समस्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय महाविद्यालयात विविध विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असताना कार्यरत डॉक्टरांचीच प्रतिनियुक्ती अन्यत्र केली जात असल्याने अंबाजोगाईकरांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सरकारचा नेमका उद्देश काय ?
‘स्वाराती’ मध्ये वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत अनुभवी डॉक्टरांची संख्या कमी झाल्यास विद्यार्थ्यांच्या अध्यापनासोबतच रुग्णसेवेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘स्वाराती’ मधील डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यामागे सरकारचा नेमका उद्देश काय ? असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, ‘स्वाराती’ च्या प्रश्नांकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे अपेक्षित लक्ष नसल्याची टीकाही होत आहे. रुग्णालयातील मनुष्यबळ, तज्ज्ञ डॉक्टर, प्राध्यापक तसेच विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर ठोस पाठपुरावा होण्याची गरज असताना लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
50 वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या ‘स्वाराती’ ला बळकटी देण्याऐवजी डॉक्टरांची प्रतिनियुक्ती केली जात असेल, तर संस्थेच्या भवितव्याचे काय ? असा प्रश्न आता अंबाजोगाईकरांसह विद्यार्थी आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केला जात आहे. सरकारने या निर्णयाचा फेरविचार करून ‘स्वाराती’ तील रिक्त पदे भरावीत आणि उपलब्ध मनुष्यबळ कायम ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.



