अंबाजोगाईत शेतकऱ्यांचा ‘जन आक्रोश’ मोर्चा : विविध मागण्यांसाठी शासनाचे वेधले लक्ष…!

टीम AM : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी अंबाजोगाई शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (खरात‌ गट) शेतकरी ‘जन आक्रोश’ मोर्चा’ काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी‌ यांना देण्यात आले.

सरसकट दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पीकविमा मंजूर करावा, 2025 चा थकीत पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये अनुदान द्यावे, दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

तसेच लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेल्या महिलांचा समावेश करून थकीत हप्ते जमा करावेत, ‘पीएम’ आवास व ‘रमाई’ घरकुल योजनेचे थकीत हप्ते वितरित करावेत, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वाढवावे, जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले दर कमी करावेत, अंबाजोगाई नगरपालिकेच्या हद्दीतील भोगवट्यातील जागा मालकी हक्कात देण्यात याव्यात, अशी मागणीही करण्यात आली. या मोर्चात ‌रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अक्षय भुंबे, रिपब्लिकन सेनेचे जीवन गायकवाड आणि समविचारी पक्षाचे धिमंत राष्ट्रपाल, अरुण बनसोडे, अमोल पौळे, अशोक पालके, राजेश वाहुळे, बादल तरकसे यांच्यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here