टीम AM : कुळाची जमीन मूळ मालकाच्या नावे करावी तसेच कुळाची जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या भूमाफियांवर ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, या मागण्यांसाठी ‘भीम आर्मी’ चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब मांदळे हे अंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी शहरातील यशवंतराव चव्हाण चौकात सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी बाबासाहेब मांदळे यांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन न्याय द्यावा, अशी मागणी केली.
कुळाच्या जमिनीचा प्रश्न मार्गी लावून संबंधित जमीन मूळ मालकाच्या नावे करण्याची कार्यवाही करावी, तसेच जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. ‘बाबासाहेब मांदळे यांना न्याय मिळालाच पाहिजे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
‘रास्ता रोको’ आंदोलनामुळे यशवंतराव चव्हाण चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले असून, आता बाबासाहेब मांदळे यांच्या उपोषणाची प्रशासनाकडून काय दखल घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनात ‘भीमशक्ती’ चे भिमराव सरवदे, नगरसेवक मालू जोगदंड, राजेश वाहुळे, अक्षय भुंबे, विनोद शिंदे, अमोल पौळे, जीवन घाडगे यांच्यासह असंंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.



